मेडिगट्टा प्रकल्पाच्या सर्वेक्षणास पुन्हा विरोध
By Admin | Updated: February 15, 2016 01:24 IST2016-02-15T01:24:12+5:302016-02-15T01:24:12+5:30
सिरोंचा तालुक्यातील मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.

मेडिगट्टा प्रकल्पाच्या सर्वेक्षणास पुन्हा विरोध
ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात आश्वासन मागितले : अधिकारी व कर्मचारी सर्वेक्षण न करताच परतले
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र या सिंचन प्रकल्पाला दिवसेंदिवस विरोध वाढत असून या परिसरातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासनाची अट घालून सर्वेक्षणाविनाच परत पाठविले.
सिरोंचा तालुक्यासाठी धोक्याची घंटा ठरलेल्या मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पासंबंधी चर्चा करण्यासाठी पेंटीपाका, तुमनूर, पोचमपल्ली या गावात सिरोंचातील एका महसूल अधिकाऱ्यांसह सर्वेक्षणाची चमू गेली. परिसरातील जनतेला त्यांनी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम करू देण्याची विनंती केली. तुमचे गाव बुडीत क्षेत्रात जाणार नाही, याची शाश्वती देतो, असे सांगताच समस्त ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकतेचे दर्शन घडवित आम्हाला पोकळ आश्वासन नको, एकही गाव बुडीत क्षेत्रात जाणार नाही, असे लेखी आश्वासन द्या, तेव्हाच आम्ही सर्वेक्षणाचे काम करू देणार, असे स्पष्ट सांगितले. आम्हाला मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्प नको, असे बजावित तेथून निघून जाण्याचा सल्ला ग्रामस्थांनी त्यांना दिला. त्यानंतर महसूल अधिकारी व सर्वेक्षण करणारी चमू परत गेली.
यापूर्वीसुध्दा तेलंगणा व महाराष्ट्राची संयुक्त सर्वेक्षण टीम सर्वेक्षणासाठी आली होती. तेव्हा संबंधित ग्रामस्थांनी त्यांना प्रचंड विरोध केला. त्यानंतर तेलंगणा व महाराष्ट्राच्या सिंचाई विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी संयुक्त भेट दिली असता, त्यांनाही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. सध्या तेलंगणातील वृत्तवाहिणी व प्रसार माध्यमे सदर सिंचन प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून तत्वता मान्यता दिली असून लवकरच पूर्ण मान्यता मिळणार असल्याच्या बातम्या झळकवित आहेत. तर गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जनता महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिल्याचा पुरावा दाखवा, अशी मागणी करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
आम्ही लोकशाही मार्गाने मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाचा विरोध केला आहे. जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन जर सदर बॅरेजच्या सर्वेक्षणाचे काम थांबविले नाही तसेच सदर प्रकल्प कायमस्वरूपी रद्द केला नाही. तर आपण जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात जाणार. सिरोंचा तालुक्यातील जनतेचे कधीही नुकसान होऊ देणार नाही.
- दीपक आत्राम,
माजी आमदार विधानसभा क्षेत्र अहेरी