ट्रकमधील २२0 बोद जळून खाक
By Admin | Updated: June 4, 2014 00:03 IST2014-06-04T00:03:49+5:302014-06-04T00:03:49+5:30
देचली तेंदूयुनिटमधील तेंदूपत्ताचे बोद घेऊन बाम्हणीकडे येणारा ट्रक जिमलगट्टाच्या मेनलाईनवर शॉर्टसर्कीट झाल्याने अचानक पेट घेतला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेल २२0 बोद जळून खाक झाल्याने

ट्रकमधील २२0 बोद जळून खाक
ट्रकसह ३६ लाखांचे नुकसान : मेनलाईनवरील शॉटसर्किटमुळे आग
जिमलगट्टा : देचली तेंदूयुनिटमधील तेंदूपत्ताचे बोद घेऊन बाम्हणीकडे येणारा ट्रक जिमलगट्टाच्या मेनलाईनवर शॉर्टसर्कीट झाल्याने अचानक पेट घेतला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेल २२0 बोद जळून खाक झाल्याने ट्रकसह ३६ लाखाचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी जिमलगट्टा येथील बसस्थानकावर घडली.
देचलीपेठा तेंदू युनिटमधील २२0 तेंदूपत्ता बोद बाम्हणीकडे घेऊन येणारा एमएच ३४ एबी ७२८८ या क्रमांकाचा ट्रक जिमलगट्टा येथे पोहोचला. जिमलगट्टा येथील मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबाचे तार कमी उंचीवर असल्याने गावात ट्रक थांबविण्यात आला. त्यानंतर ट्रकमधील मजुरांनी बांबूच्या सहाय्याने जीवंत विद्युत तार वर करण्याचा प्रयत्न केला. यात अचानकपणे विद्युत तार एकमेकांना घासल्यामुळे ठिणगी उडाली व ट्रकमधील तेंदूपत्ताच्या बोदांवर पडली. मात्र ट्रकवर ठिणगी पडल्याचे ट्रकमधील मजुरांच्या लक्षात आले नाही. गावाबाहेर १00 मीटर अंतरावर ट्रक गेला असता, गावातील काही नागरिकांनी ट्रकमधील बोद जळत असल्याचे पाहिले. नागरिकांनी लगेच ट्रक ड्रायव्हरला बोद जळत असल्याचे सांगितले. परंतु अल्पावधीतच ट्रकमधील २२0 बोद जळून खाक झाले.
आसपास अग्नीशामक वा अन्य कोणत्याही सुविधा ट्रकमध्ये लागलेली आग विझविण्यासाठी नसल्याने तेंदूपत्ता बोदांसह ट्रक जळून खाक झाला. यात २५ लाख किंमतीचे ट्रक व ११ लाख किंमतीचे २२0 तेंदूपत्ता बोद जळून खाक झाले. जळलेला ट्रक आलापल्ली येथील अमोल रापेल्लीवार यांचे तर शॉर्टसर्कीटने जळालेले तेंदूपत्ता बोद तेंदू कंत्राटदार सय्यद यजदानी यांचे होते, अशी माहिती आहे.
जिमलगट्टा परिसरात अग्नीशामकची व्यवस्था नसल्यामुळे सदर घटना घडली. अग्नीशामकची व्यवस्था असती तर तेंदूपत्ताचे बोद भरलेला ट्रक जळाला नसता. (वार्ताहर)