दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन; कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:23 IST2023-02-28T13:23:00+5:302023-02-28T13:23:37+5:30
दुर्गापूर येथील घटना : येणापूर येथे शिकत होती

दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन; कारण अस्पष्ट
आष्टी (गडचिरोली) : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथील दहावीमध्ये शिकणाऱ्या एक तरुणीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, २६ फेब्रुवारी राेजी दुपारी १२ वाजताचे दरम्यान घडली. कौशीस समीर बहादूर असे आहे.
काैशीस ही तिच्या आजोबाकडे राहत हाेती. आजोबा दुकानात गेले तेवढ्या वेळात ती घरात गेली. दरवाजाची आतून कडी लावून पंख्याला गळफास घेतला. काैशीस ही बाहेर दिसत नसल्याने आजोबांनी घरात जाऊन दार ढकलले तर आतमधून लावून असल्याचे दिसून आले. शेजाऱ्यांनी दार काढून तिला फासावरून उतरवले. तिला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत तरुणी ही येणापूर येथील इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. २ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार होती. ती अभ्यासात हुशार होती, असे शिक्षकांनी सांगितले. तिचे वडील मुंबई येथे नोकरीसाठी गेले होते. तिला एक लहान बहीण व भाऊ आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण कळले नाही.