धानोरा (गडचिरोली) : घरी कोणी नसताना वेडसर पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यावर सुरीने वार करून तिची हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी तालुक्यातील कोवानटोला (जपतलाई) येथे घडली. आरोपी पतीला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. माहितीनुसार, पोलीस मदत केंद्र येरकड जवळील कोवानटोला (जपतलाई) या गावातील मीराबाई परसराम कुमरे (४५ वर्ष) ही महिला व तिचे पती परसराम धनू कुमरे (४८ वर्ष) हे मुलगा अजय (२३) याच्यासोबत राहात होते. सोमवारी अजय बाहेरगावी गेला होता. वडील वेडसरपणे वागत असल्याने त्याने आपल्या आईला सायंकाळी झोपण्यासाठी मामाच्या घरी जाण्यासाठी सांगितले होते. मामाचे घर त्याच गावी असल्याने तो निश्चिंत होता.
भाचा घरी आला अन् हत्येचा उलगडा झालामंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मृत मीराबाईचा भाचा सुनील पोटावी हा आत्याच्या घराकडे जाण्यासाठी निघाला असता मामा धनू कुमरे हा दारासमोर कुऱ्हाड घेऊन बसून होता. त्यामुळे सुनील याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने घरात जाण्याचा प्रयत्न केला असता मामा त्याच्यावरच कुऱ्हाड घेऊन धावून आला. त्यामुळे काहीतरी काळेबेरे नक्की आहे अशी त्याला खात्री झाली. त्यामुळे त्याने गावातील पोलीस पाटील, सरपंच यांना व गावकऱ्यांना सूचना देऊन आत्याच्या घराकडे धाव घेतली. धनू कुमरे याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने सर्व हकीकत सांगितली. मी पत्नीच्या डोक्यावर सुरीने वार केला व त्यात तिचा मृत्यू झाला, असे त्याने सांगितले.
हातपाय बांधून केले पोलिसांच्या स्वाधीनधनू कुमरे याने पत्नीची हत्या केल्याचे कळताच गावकऱ्यांनी त्याचे हातपाय बांधले आणि पोलीस पाटील व सरपंचानी पोलीस मदत केंद्र येरकड येथे संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर समस्त गावकऱ्यांनी धानोरा पोलीस स्टेशनला आणून आरोपीला त्यांच्या स्वाधीन केले. मृत महिलेचा मृतदेह शवपरीक्षणासाठी धानोरा येथे आणण्यात आला. आरोपी धनू कुमरे याला अटक केली असून अधिक तपास धानोरा पोलीस करीत आहेत.