गाव पाटलाची नक्षलवाद्यांकडून गोळी झाडून हत्या; भामरागड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:22 IST2022-12-30T17:15:31+5:302022-12-30T17:22:07+5:30
रात्री झोपेतून उठवून केले अपहरण

गाव पाटलाची नक्षलवाद्यांकडून गोळी झाडून हत्या; भामरागड तालुक्यातील घटना
भामरागड (गडचिरोली) : भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील तुमरगोडी येथील गावपाटलाची नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. घिसू मट्टामी (५० वर्षे) असे मृताचे नाव आहे.
नक्षलवाद्यांनी गुरुवारी रात्री ९ नंतर गावात येऊन मट्टामी यांना झोपेतून उठवत सोबत नेले. त्यांना मारहाण करून नंतर गोळी झाडण्यात आली. सकाळी गावाजवळ मट्टामी यांचा मृतदेह आणि जवळच एक चिठ्ठी आढळली. त्यात पोलिसांसाठी काम करत असल्यामुळे हत्या केल्याचा मजकूर असल्याचे सांगितले जाते.
नक्षलवाद्यांमध्ये अंतर्गत वाद?
वास्तविक घिसू मट्टामी यांचा पोलिसांसोबत कोणताही संबंध नसून, त्यांना पोलिस ओळखतही नव्हते, असे अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांनी सांगितले. मट्टामी हा नक्षल्यांच्या ग्रामरक्षक दलाचा सदस्य असण्याची शक्यता असून, नक्षलवाद्यांच्या अंतर्गत वादातून त्याची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी ८ नोव्हेंबरला एटापल्ली तालुक्यातील झुरी गावातील दिलीप ऊर्फ नीलेश गजू हिचामी या सहकाऱ्याची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती.