छत्तीसगड सीमेवर एका नक्षल्याचा खात्मा ! नक्षलवाद्यांचे दोन तळ जवानांनी केले उद्ध्वस्त; एक जवान जखमी
By संजय तिपाले | Updated: February 5, 2026 20:41 IST2026-02-05T20:41:09+5:302026-02-05T20:41:38+5:30
Gadchiroli : नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून सी-६० च्या जवानांनी पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा परिचय दिला. भामरागड उपविभागातील छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात झालेल्या भीषण चकमकीत ५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातले.

A Naxal was killed on the Chhattisgarh border! Two camps of Naxalites were destroyed by the soldiers; One soldier was injured
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून सी-६० च्या जवानांनी पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा परिचय दिला. भामरागड उपविभागातील छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात झालेल्या भीषण चकमकीत ५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातले. या कारवाईत नक्षलवाद्यांचे दोन मोठे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. दरम्यान, नक्षल्यांच्या भ्याड गोळीबारात सी-६० चा एक जवान जखमी झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, नक्षलवाद्यांच्या 'कंपनी क्रमांक १०' आणि छत्तीसगडमधील एका दलमचे सदस्य फोदेवाडा जंगल परिसरात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहेत. ही माहिती मिळताच विलंब न लावता भामरागडच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सी-६० च्या १४ पथकांनी रात्रीच्या अंधारातच जंगलाला वेढा टाकला. ४ रोजी दिवसा झालेल्या पहिल्या चकमकीत जवानांनी आक्रमक पवित्रा घेत नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. मात्र, घनदाट झाडीचा फायदा घेत नक्षलवादी पसार झाले. ५ रोजी सकाळी पुन्हा मोहिमेला धार चढवण्यासाठी अतिरिक्त ४ पथके आणि सीआरपीएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. दुपारी जवानांना एका नक्षल्याचा मृतदेह सापडला असून, त्याच्याजवळ जप्त केलेली शस्त्रे पाहता तो मोठा कमांडर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जवान जखमी, हेलिकॉप्टरने हलविले
संध्याकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला, ज्यामध्ये सी-६० चा एक जवान गोळी लागून जखमी झाला. जखमी जवानाला तातडीने हेलिकॉप्टरने उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस दलाने स्पष्ट केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.