मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलीला वाहनाने चिरडले
By संजय तिपाले | Updated: June 1, 2024 13:59 IST2024-06-01T13:59:17+5:302024-06-01T13:59:38+5:30
Gadchiroli : देसाईगंज येथे आरमोरी मार्गावरील जैवविविधता उद्यानाजवळ घडली घटना

A girl who went for a morning walk was crushed by a vehicle
गडचिरोली: माॅर्निंग वॉकसाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीला अज्ञात वाहनाने चिरडले. यात ती जागीच ठार झाली. ही घटना १ जून रोजी पहाटे साडेपाच वाजता देसाईगंज येथे आरमोरी मार्गावरील जैवविविधता उद्यानाजवळ घडली.
शर्वरी पद्माकर बनकर (१४,रा. तुकुम वॉर्ड, देसाईगंज ) असे मयत मुलीचे नाव आहे. ती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत होती. नित्याप्रमाणे १ जून रोजी ती पहाटे मॉर्निंग वॉक करता घराबाहेर पडली. आरमोरी मार्गावर वनविभागाच्या जैवविविधता उद्यानासमोर तिला अज्ञात वाहनाने चिरडले.
तिच्या डोक्यावरुन चाक गेल्याने ती जागीच गतप्राण झाली. दरम्यान, तिला चिरडल्यानंतर चालकाने वाहन न थांबवता सुसाट निघून गेला. काही वेळाने या मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांना शर्वरी बनकर ही रक्ताच्या थारोळ्यात आढळली. त्यानंतर देसाईगंज पोलिसांना पाचारण केले. पो.नि. अजय जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. वाहनचालकाचा शोध सुरु असल्याचे पो.नि. अजय जगताप यांनी सांगितले.
आईचा आक्रोश
दरम्यान, मृत शर्वरीचे वडील हे पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करतात तर आई व शर्वरी या गावी राहतात. शर्वरीच्या अपघाती मृत्यूची बातमी कानावर पडल्यावर आईने काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. यामुळे वातावरण सुन्न झाले होते.