अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 18:59 IST2022-11-04T18:58:44+5:302022-11-04T18:59:37+5:30
Gadchiroli News अवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीला आपल्या वासनेची शिकार बनविणाऱ्या नराधम युवकाला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले.

अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करणारा जेरबंद
गडचिरोली: अवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीला आपल्या वासनेची शिकार बनविणाऱ्या नराधम युवकाला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले. गेल्या तीन महिन्यांपासून नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागातील जंगल परिसरात लपून बसून तो पोलिसांना हुलकावणी देत होता, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपी सुंदरसाई मडावी (२५, रा. करपनफुंडी) हा गावात आल्याचे समजताच त्याला पकडण्यात आले. गडचिरोली येथील जिल्हा सत्र व विशेष न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली. गावातील तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर एटापल्ली पोलिसांनी कलम ३७६ (२) (जे), ३७६ (एबी) भादंवि, सहकलम ४, ६ पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तो पोलिसांच्या भीतीने नक्षलदृष्ट्या संवेदनशील भाग असलेल्या येलचिल जंगल परिसर, बुर्गी जंगल परिसर आणि ताडगाव जंगल परिसरामध्ये लपून बसला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या.
दरम्यान हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या नेतृत्वाखाली बुर्गी पोलीस मदत केंद्राचे पोलील उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे, संदीप इसकोटी तसेच अंमलदार यांच्या टीमने गोपनीय यंत्रणेच्या मदतीने आरोपी सुंदरसाई याला त्याच्या गावातून अटक केली.