उरले ९ माओवादी, ५६ दिवस... जोरदार व्यूहरचना 'लाल दहशती'च्या अंतासाठी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:44 IST2026-02-04T14:43:31+5:302026-02-04T14:44:06+5:30
सुरक्षा यंत्रणा सज्ज : तीन पुरुष, सहा महिलांचा समावेश, सीमावर्ती भागातील पोलिस ठाण्यांमुळे कोंडी

9 Maoists left, 56 days... Strong strategy to end 'Red Terror'!
संजय तिपाले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्चपूर्वी देशातून माओवाद हद्दपार करण्याची भीष्मप्रतीज्ञा केलेली आहे. याचे 'काउंटडाउन' सुरू झाले आहे. जिल्ह्यात आता केवळ ९ सशस्त्र माओवादी शिल्लक असून, पोलिसांच्या हाती ५६ दिवस आहेत. त्यामुळे 'लाल दहशती'च्या अंताची शेवटची लढाई लढण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून सर्व क्षमता पणाला लावण्याची व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती आहे.
१९८० च्या दशकात ओडिशामार्गे शेजारच्या छत्तीसगड व तेलंगणातून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोलीत प्रवेश करणाऱ्या माओवाद्यांनी दंडकारण्यातील घनदाट जंगलात आश्रय घेतला, त्यानंतर हळूहळू संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दहशतीचे प्रतिकूल साम्राज्य निर्माण केले. भौगोलिक स्थिती, पायाभूत सुविधांचा अभाव आणि आदिवासीबहुल दुर्गम, अतिदुर्गम गावांमध्ये एकेकाळी माओवाद्यांची प्रचंड जरब होती. माओवाद्यांविरुद्धच्या या लढाईत शेकडो जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, यासोबतच अनेक निष्पाप नागरिकांना माओवाद्यांनी निघृणपणे ठार केले. परिणामी या भागात पायाभूत सुविधाही लवकर पोहोचू शकल्या नाहीत. सध्या जिल्ह्यात शिल्लक असलेल्या ९ माओवाद्यांमध्ये सहा महिला असून, तीन पुरुष आहेत. यामध्ये दंडकारण्य स्पेशल झोनल समिती सदस्य प्रभाकर (रा. कामारेड्डी, तेलंगणा) याच्यासह विभागीय समिती सदस्य राजू वड्डे (रा. भैरमगड, छत्तीसगड) या दोन जहाल नेत्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पोलिस महासंचालकांनी घेतला आढावा
माओवादविरुद्ध लढाईतील अतिशय महत्त्वाचा धागा म्हणजे सीमावर्ती भागातील पोलिस मदत केंद्र. या श्रृंखलेतील दहावे पोलिस ठाणे २४ जानेवारी रोजी भामरागड तालुक्याच्या बिनागुंडा या अतिदुर्गम गावात उभारण्यात आले. ३० जानेवारी रोजी नवे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी या पोलिस ठाण्यास भेट दिली. यावेळी त्यांनी माओवादविरोधी व्यूहरचनेचा सविस्तर आढावा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. शेजारच्या छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांशी समन्वय साधून येत्या काही दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
चळवळ नेतृत्वहीन, नवे कॅडर, रसदही बंद
माओवाद्यांचा प्रमुख नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती याने १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या ६० सहकाऱ्यांसह शरणागती पत्करली. वर्षभरात त्याच्यासह सहा केंद्रीय समिती सदस्यांनी आत्मसमर्पण केले. नेतृत्वहीन झालेल्या चळवळीला नवे कॅडर मिळणे कठीण झाले, रसद बंद झाली, सीमावर्ती भागातील दहा नव्या पोलिस मदत केंद्रांमुळे त्यांच्या हालचालींवर निर्बंध आले, परिणामी एकेकाळी हजारोंवर संख्या असलेल्या माओवादी कॅडरची संख्या सध्या जेमतेम नऊपर्यंत गडगडली.
"केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या डेडलाइनपूर्वीच जिल्हा माओवादमुक्त करण्याचे नियोजन आहे. सध्या जिल्हा पोलिस दलाकडील नोंदीनुसार केवळ नऊ माओवादी शिल्लक आहेत. त्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील व्हावे, अन्यथा माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र केले जाणार आहे."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली