शिक्षकांसाठी ८९१ गावे अवघड

By Admin | Updated: May 10, 2017 01:30 IST2017-05-10T01:30:21+5:302017-05-10T01:30:21+5:30

शिक्षकांच्या बदल्या करताना जिल्ह्यातील गावांचे सर्वसाधारण व अवघड या दोन भागात विभाजन करण्याचे

8,91 villages difficult for teachers | शिक्षकांसाठी ८९१ गावे अवघड

शिक्षकांसाठी ८९१ गावे अवघड

६४५ सर्वसाधारण क्षेत्र : बदल्यांसाठी शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे विभागणी
दिगांबर जवादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिक्षकांच्या बदल्या करताना जिल्ह्यातील गावांचे सर्वसाधारण व अवघड या दोन भागात विभाजन करण्याचे निर्देश शासनाने २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये शिक्षण विभागाला दिले होते. विविध विभागांकडून माहिती मागवून शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १५३६ गावांपैकी ८९१ गावे अवघड क्षेत्रात तर ६४५ गावे सर्वसाधारण क्षेत्रात मोडत असल्याचे जाहीर केले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र या शाळांमध्ये अध्यापन करण्यास शिक्षक तयार होत नसल्याने दरवर्षी शिक्षकांच्या बदल्यांदरम्यान राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये मोठा गोंधळ उडत होता. या सर्व प्रकाराला आळा बसण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच शासनाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्ह्यातील गावांचे अवघड व सर्वसाधारण या दोन भागात विभाजन करण्याचे निर्देश दिले. जे क्षेत्र तालुका मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यास सोयीसुविधा नाही. दुर्गम व डोंगराळ भागातील गावांना अवघड क्षेत्र म्हणून जाहीर करावे. तर हे क्षेत्र वगळता इतर क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रात टाकण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षण विभागाने मागील दोन महिन्यांपासून विविध विभागाकडून माहिती मागितली. त्या माहितीवरून जिल्हा परिषदेने ६४५ गावे सर्वसाधारण क्षेत्रात मोडतात. तर ८९१ गावे अवघड क्षेत्रात मोडत असल्याचे जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, कोरची हे तालुके जंगलांनी व्यापलेले आहेत. या तालुक्यांमध्ये नक्षलवादाची समस्या आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील सर्वच गावे अवघड क्षेत्रात टाकण्यात आली आहेत. तर आरमोरी, देसाईगंज या तालुक्यांमधील सर्वच गावे सर्वसाधारण क्षेत्रात टाकण्यात आली आहेत. काही शिक्षक संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे.

बदल्यांसाठी झाले सोईचे
दुर्गम भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांवर दरवर्षी अन्याय होत होता. आता मात्र अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रातच संबंधित शिक्षकांची बदली केली जाणार आहे. त्यामुळे नवीन धोरण बदल्यांसाठी सोईचे झाले आहे.

शिक्षक संघटनांचा आक्षेप
आरमोरी तालुका मुख्यालयापासून ४० ते ५० किमी अंतरावर नवेगाव, चव्हेला, पिपरटोला, नरचुली, भाकरोंडी, मेंढा, कोसमटोला, बाजीराव टोला, खडकी, भांसी, दवंडी, परसवाडी, जांभळी, सरपंचटोला, संगलटोला, येंगळा, थोटेबोडी, कुरंडी, वानचुआ, पिसेवडधा, कोरेगाव ही गावे जंगलांनी व्यापली आहेत. चामोर्शी तालुक्यातील रेगडी केंद्रातील तसेच मक्केपल्ली केंद्रातील शाळा, कुरखेडा तालुक्यातील सोनसरी, पुराडा, खेडेगाव केंद्रांतर्गतच्या सर्व शाळा, गेवर्धा केंद्रांतर्गतच्या काही शाळा, धानोरा तालुक्यातील इरूपटोला, कारवाफा केंद्रातील सर्व शाळा व मोहली, रांगी, केंद्रातील काही शाळा दुर्गम भागात मोडतात. मात्र या गावांना अवघड क्षेत्रात टाकण्यात आले नाही, असा आक्षेप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या गावांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्याची मागणी केली आहे. शासन निर्णयानुसार यादीवर सात दिवसांच्या आत शिक्षकांना आक्षेप घेता येणार आहे. मात्र अंतिम निर्णय हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा राहणार आहे.

 

Web Title: 8,91 villages difficult for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.