गडचिरोलीत आणखी ६४ हजार कुटुंबांना हवे घरकुल ; घरकुलासाठी पात्र आहेत कि नाही होणार पडताळणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 19:59 IST2025-08-29T19:57:01+5:302025-08-29T19:59:02+5:30
ऑनलाइन सर्वेत नोंद : पडताळणीचे काम सुरू, दुबार लाभ घेऊ नये म्हणून प्रशासन सतर्क

64 thousand more families in Gadchiroli need shelters; Will verify whether they are eligible for shelters or not
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: मागील दोन वर्षांच्या कालावधीत शासनाने मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजुरी दिली आहे. तरीही काही नागरिक घरकुलापासून वंचित आहेत. ज्यांना घरकुलाची गरज आहे, त्यांनी स्वतःच सर्व्हे करून नोंदणी करायची होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६४ हजार ३४१ जणांनी नोंदणी केली आहे. हे खरेच घरकुलासाठी पात्र आहेत काय, याची पडताळणी केली जात आहे.
देशातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहू नये, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेचा आता दुसरा टप्पा सुरू आहे. 'ड' यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्वच नागरिकांना घरकुलाचा लाभदेण्यात येत आहे. मात्र ही यादी जवळपास आठ वर्षांपूर्वीची आहे. या कालावधीत काही कुटुंबांचे विभाजन झाले; तर काही लाभार्थी 'ड' यादीतून चुकीने सुटले. अशांना घरकुलाची संधी देण्यासाठी केंद्र शासनाने घरकुलांच्या सर्व्हेचे आदेश दिले. तो स्मार्ट फोनच्या साहाय्याने करावयाचा होता. यात अनेकांनी सर्व्हे करीत घरकुलासाठी नोंदणी केली आहे.
घरकुलाची अपेक्षा
'ड' यादीतील नागरिकांना घरकुल मिळणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र यातील सर्वच लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली. अनेकांना पक्की घरे आहेत. काही नोकरीवर आहेत. अशांनाही घरकुले मंजूर झाली आहेत. आपल्यालाही घरकुल मिळेल या अपेक्षेने अनेकजण अपात्र असतानाही नोंदणी केली आहे.
२६ हजार ५७ नोंदणीची पडताळणी सुरू
ज्या नागरिकांनी घराची मागणी दर्शविली आहे, ते खरच घरकुलासाठी पात्र आहेत काय ? याची पडताळणी पंचायत समिती स्तरावरून केली जात आहे. सुमारे ८ हजार ८४९ घरांची पडताळणी झाली आहे. १७ हजार २०८ नोंदी प्रलंबित आहेत. पुन्हा यांतील काही नोंदी अपात्र होण्याची शक्यता आहे.
१२ महिने अनुदानाअभावी बरेच घरकुल अद्यापही अपूर्ण
उलटूनही अनेक घरांचे काम अपूर्ण आहे. पावसाळ्यानंतर घरकुलाच्या बांधकामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने लाभार्थ्यांनी नियोजन केले आहे.
तालुकानिहाय नोंदणी
तालुका नोंदणी पात्र
गडचिरोली ६३०१ १५९२
धानोरा ५३२६ २९७५
देसाईगंज ४७४४ १४८४
आरमोरी ५९४९ १०२०
कुरखेडा ६१६८ ७९५
कोरची ३३३९ ९७६
चामोर्शी १२२५१ ८६७६
मुलचेरा ३०६५ ४०८
अहेरी ६६६६ २५२९
सिरोंचा ६८७७ ३७३६
एटापल्ली ३१११ १६२०
भामरागड ५४४ २४६
एकूण ६४३४१ २६०५७
कागदपत्रे नसतानाही नोंदणी
नोंदणी स्वतःच मोबाइल अॅपच्या साहाय्याने करायची होती. त्यामध्ये स्वतःच्या घराचा फोटो टाकायचा होता. अनेकांचे पक्के घर असतानाही त्याच पक्क्या घराचा फोटो अॅपवर अपलोड केला आहे. तर काही कुटुंबांत एकत्र राहत असतानाही दोन ते तीन भावांनी अर्ज नोंदविले आहेत. त्यामुळे ते अपात्र ठरले आहेत.
३८ हजार जणांची नोंदणी पहिल्याच टप्प्यात बाद
घरकुलाच्या लाभासाठी नागरिकांना स्वतःच नोंदणी करायची होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६४ हजार ३४१ जणांनी नोंदणी केली. पहिल्याच टप्प्यात ३८ हजार २८४ नोंदणी बाद झाली. पडताळणीचे काम सुरू आहे.