५०० कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही
By Admin | Updated: August 18, 2014 23:28 IST2014-08-18T23:28:41+5:302014-08-18T23:28:41+5:30
शिधापत्रिकांसाठी आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मात्र शासनाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावातील जवळपास ५०० कुटुंबाकडे स्वातंत्र्याच्या

५०० कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही
कुरखेडा : शिधापत्रिकांसाठी आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मात्र शासनाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावातील जवळपास ५०० कुटुंबाकडे स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही शिधापत्रीका नसल्याचे वास्तव नुकत्याच घेण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात उघडकीस आले आहे.
आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडाच्यावतीने येथील राजीव भवनात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात कुरखेडा तालुक्यात मौशी, आंधळी, पलसगड, खेडेगाव, तळेगाव, अंतरगाव, सादूटोला, शिवणी, येरंडी, जांभुळखेडा, वासी, वाघेडा व पुराडा आदी गावातील २५० नागरिकांनी दर्शविला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष शुभदा देशमुख होत्या. यावेळी मंचावर पुरवठा निरिक्षक के. टी. कुमरे, एस. जी. चव्हरे, नायब तहसीलदार ए. आर. पाथड, डी. टी. किरको आदी उपस्थित होते.
सर्वांना पोटभर व सुरक्षीत अन्न मिळावे यासाठी शासनाने प्रत्येक गावी स्वस्त धान्य दुकान देण्याचे धोरण निश्चित केले आहे. या योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी यासाठी आवश्यक शासन प्रणालीही लागू करण्यात आली आहे. असे असतानासुध्दा बऱ्याच गाव पातळीवर राशन स्वस्त धान्य दुकानाची व्यवस्था अडचणीत सापडली आहे. कुरखेडा तालुक्यातील जवळपास ५०० नागरिकांनी वर्षभरापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही त्यांना अद्यापही शिधापत्रिीका मिळालेली नाही. यामुळे त्यांना स्वस्त धान्य दुकानाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
अपुरा धान्यसाठा, पुरवठ्यातील अनियमितता, धान्य, साखर व केरोसीनची विक्री शासकीय दरापेक्षा अधिक दराने सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानातील धान्यसाठ्याची माहिती फलकावर नसणे आदी प्रश्नही या जनसंवाद कार्यक्रमात उपस्थि महिलांनी मांडले.
यावेळी उपस्थित असलेले पुरवठा अधिकारी व नायब तहसीलदारांनी पीडित नागरिकांना कार्यालयात बोलावून अडचणी दूर करण्याचे आश्वासन यावेळी दिले. कुरखेडा तालुक्यासारखीच परिस्थिती अहेरी, कोरची, भामरागड, एटापल्ली, धानोरा या तालुक्यातही आहे. या तालुक्यातील अनेक नागरिक शिधापत्रिकांपासून वंचित असल्याचे दिसून येते. जनसंवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत कापसे, भारती सोनाग्रे, प्रशांत गेडाम, मधूसूदन नेवारे, देशीरताई घाटघुमर, जानकी बन्सोड, आशा तुलावी, चंदा दाऊदासरे आदींनी सहकार्य केले.