उद्दिष्टाच्या ५० टक्केच कर्ज वाटप
By Admin | Updated: July 5, 2014 23:35 IST2014-07-05T23:35:06+5:302014-07-05T23:35:06+5:30
चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून सुमारे १०९.८५ कोटी रूपयाचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्त ४५.०९ कोटीचेच

उद्दिष्टाच्या ५० टक्केच कर्ज वाटप
गडचिरोली : चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून सुमारे १०९.८५ कोटी रूपयाचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्त ४५.०९ कोटीचेच कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सावकाराच्या घराचे उंबरठे झिजविण्याची पाळी आली आहे.
आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी बराच खर्च येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात भांडवल शेतकऱ्यांजवळ राहत नसल्याने कर्ज काढूनच शेती करावी लागते. पूर्वी सावकाराकडूनच कर्ज घेऊन शेतकरी पिकांची लागवड करीत होता. मात्र सावकार शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शेतकरी वर्गाला सुमारे २५ ते ३० टक्के व्याज दराने कर्जाचा पुरवठा करीत होता. त्याचबरोबर कर्जाची रक्कम वाढवून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात होती. परिणामी शेतीतून प्राप्त झालेले बहुतांश उत्पन्न सावकाराचे कर्ज फेडण्यावरच खर्च होत होते.
शेतकऱ्यांची सावकाराच्या पाशातून सुटका करण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना शेतकरी वर्गाला कर्ज देणे सक्तीचे केले आहे. प्रत्येक बँकेला शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्टसुध्दा देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना ५२ कोटी ७३ लाख, सहकारी बँकांना ४४ कोटी ४२ लाख, ग्रामीण बँकांना १२ कोटी ६५ लाख असे एकूण १०९ कोटी ८५ लाखाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ ९ कोटी ९८ लाख, सहकारी बँका २९ कोटी ८१ लाख व ग्रामीण बँकांनी ५ कोटी ३० लाख रूपये असे एकूण ४५.०९ कोटी रूपये कर्जाचे वाटप केले आहे.
प्रत्येक बँकेला कर्ज वाटप करणे सक्तीचे असले तरी राष्ट्रीयकृत बँका मात्र शेतकऱ्यांना दारातही उभे होऊ देत नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. शेतकरी कर्ज निश्चित कालावधीत फेडत नाही, असा गैरसमज या बँकांचा झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ २० टक्केच कर्ज वाटप केले आहे. याबद्दल वरिष्ठस्तरावरून विचारणा झाल्यास शेतकरीवर्ग कर्जासाठी अर्ज करीत नाही, असे उलट उत्तर देण्यात येते.
आधुनिक पध्दतीने यांत्रिक शेती करण्यासाठी बराच खर्च येत असल्याने शेतकऱ्याला कुठूनही कर्ज घेणे भाग असते. त्यामुळे शेतकरी वर्गाला नाईलाजास्तव सावकाराच्या दारावर उभे होऊन कर्जाची भिक मागावी लागत आहे. (नगर प्रतिनिधी)