४ लाख रूपयांची अफरातफर
By Admin | Updated: June 28, 2014 23:34 IST2014-06-28T23:34:01+5:302014-06-28T23:34:01+5:30
फ्रेंड्स दूग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित आरमोरीचे अध्यक्ष व जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गडचिरोली यांनी इंटिग्रेटेड डेअरी फार्म प्रोजेक्ट या केंद्र सरकारच्या प्रकल्पातील मिळालेल्या अनुदानापैकी

४ लाख रूपयांची अफरातफर
कारवाई नाही : दूग्ध संस्थाध्यक्ष व जिल्हा दूग्ध विकास अधिकारी यांनी केली
गडचिरोली : फ्रेंड्स दूग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित आरमोरीचे अध्यक्ष व जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गडचिरोली यांनी इंटिग्रेटेड डेअरी फार्म प्रोजेक्ट या केंद्र सरकारच्या प्रकल्पातील मिळालेल्या अनुदानापैकी ४ लाख ८० हजार २०० रूपयाची अफरातफर करून शासनाची व इतर प्रकल्प लाभार्थ्याची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
सन २०१०-११ या वर्षात केंद्र शासनाने फ्रेंड्स दुग्ध उत्पादक सहकारी संस्था आरमोरी या संस्थेला इंटिग्रेटेड डेअरी फार्म प्रोजेक्ट मंजूर करून ४८ लाख रूपयाचे अनुदान दिले. या अनुदानात शेडचे बांधकाम, गार्इंचा चारा, गायींचा विमा व इतर आवश्यक यंत्रसामुग्री तसेच १०० दुधाळू गायी खरेदी करावयाच्या होत्या. या १०० गायींपैकी ५० टक्के रक्कम ही शासनाने अनुदान दिली होती. तर ५० टक्के रक्कम ही लाभार्थ्यांनी भरावयाची होती. या प्रकल्पाकरीता ३५ लाभार्थ्यांनी प्रत्येकी १ हजार ५०० रूपये संस्थेकडे जमा केले व संस्थेने शासनाकडून ३५ दुधाळू जनावरे खरेदी करून विमा व चाऱ्याचे प्रत्येकी १९ हजार ३०० रूपयाची उचल केली. परंतु ३५ दुधाळू गायी खरेदी करण्याऐवजी फक्त २१ दुधाळू गायी खरेदी करण्यात आल्या. उर्वरित १४ गायी संस्थेच्या अध्यक्षांनी कधीच खरेदी केल्या नाहीत व लाभार्थी हिस्सा २ लाख १० हजार रूपयाची अफरातफर केली.
जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गडचिरोली व संस्थेचे अध्यक्ष यांच्या नावाचे संयुक्त खाते असून जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या सहीशिवाय शासकीय अनुदानित रक्कम खात्यातून काढता येत नाही. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षांनी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गडचिरोली यांच्याशी संगनमत करून कटकारस्थान करून ७ खोट्या लाभार्थी देविदास गोपाळा जुआरे, दादाजी धर्माजी मने, प्रकाश नानाजी चौधरी, विठोबा गोयाजी दुपारे, लालाजी गोपाळा दोनाडकर, किरण केशव ठाकरे, विनायक धोंडू शिलार, यांच्या नावाने खोट्या पावत्या जोडून १४ गायी खरेदी केल्याचे दाखविले व शासकीय अनुदानाची रक्कम २ लाख ७० हजार २०० रूपयाची उचल केली. परंतु प्रत्यक्षात एकही गाय खरेदी केली नाही. उलट प्रकल्पामधील २१ गायींपैकी अनेक गायी संस्थेचे अध्यक्ष वामन जुआरे यांनी परस्पर विकून टाकल्या.
आजच्या घडीला प्रकल्पात केवळ ४ गायी शिल्लक आहेत. सर्व गायींबाबत संस्थाध्यक्षाला विचारणा केली असता, संस्थाध्यक्ष नेहमीच उडवाउडवीचे उत्तरे देत होते व डी.डी.ओ. सुध्दा उडवाउडीवेचे उत्तरे देत होते. म्हणून लाभार्थ्यांनी आयुक्त मुंबई यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून आयुक्तांनी सदर प्रकरणात चौकशीचे आदेश देऊन अहवाल मागविला. सदर अहवालात संस्थेचे अध्यक्ष वामनराव जुआरे व डी.डी.ओ. गडचिरोली यांना दोषी ठरविण्यात आलेले आहे. परंतु अहवाल १३ डिसेंबर २०१३ रोजी प्राप्त होऊनसुध्दा अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. अजुनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संस्थाध्यक्ष जुआरे व डी.डी.ओ. यांची हिंमत वाढली असून सध्या संस्थेच्या खात्यात जमा असलेले अंदाजे १९ लाख रूपयाची पुन्हा अफरातफर केली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष वामनराव जुआरे व जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गडचिरोली यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी संस्थेच्या प्रकल्पाचे लाभार्थी व जि.प. सदस्य अमोल मारकवार यांनी केली आहे.