जिल्ह्यात ३७ कोटींचे धानाचे चुकारे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:27+5:30
महामंडळाच्या वतीने धानाची विक्री केलेल्या संबंधित शेतकऱ्यांना ऑनलाईन स्वरूपात चुकारे थेट बँक खात्यात अदा केले जातात. आतापर्यंत दोन्ही हंगाम मिळून एकूण ३ अब्ज ६३ कोटी ६५ लाख ७८ हजार रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. तरीही अजून ३७ कोटी ७२ लाख रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात ३७ कोटींचे धानाचे चुकारे प्रलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत यंदाचा खरीप व रबी हंगाम मिळून एकूण २२ लाख ११ हजार ४६६ क्विंटल इतक्या धानाची खरेदी करण्यात आली. महामंडळाच्या वतीने धानाची विक्री केलेल्या संबंधित शेतकऱ्यांना ऑनलाईन स्वरूपात चुकारे थेट बँक खात्यात अदा केले जातात. आतापर्यंत दोन्ही हंगाम मिळून एकूण ३ अब्ज ६३ कोटी ६५ लाख ७८ हजार रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. तरीही अजून ३७ कोटी ७२ लाख रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत.
आदिवासी विकास महामंडळातर्फे १ ऑक्टोबर २०१९ पासून ३० एप्रिल २०२० पर्यंत खरीप हंगामात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात आधारभूत केंद्रांवरून धानाची खरेदी करण्यात आली. तसेच १ मे २०२० पासून तर ३० जून २०२० पर्यंत रबी हंगामात धानाची खरेदी करण्यात आली. दोन्ही हंगाम मिळून गडचिरोली जिल्ह्यात एकूण १९ लाख ३७ हजार १८६ क्विंटल अशी धानाची विक्रमी खरेदी करण्यात आली.
खरीप हंगामात गडचिरोली कार्यालयामार्फत १२ लाख ८३ हजार ७८४ क्विंटल तर अहेरी उपविभागात ६ लाख ५३ हजार ४०१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. रबी हंगामात गडचिरोली कार्यालयाच्या हद्दीत १ लाख ३५ हजार ७०३ क्विंटल तर अहेरी कार्यालयाच्या हद्दीत १ लाख ३८ हजार ५७६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. दोन्ही हंगाम मिळून गडचिरोली कार्यालयाच्या वतीने २ अब्ज ५७ कोटी ६३ लाख ७० हजार ४४७ रुपये किमतीच्या धानाची खरेदी करण्यात आली. अहेरी कार्यालयाच्या हद्दीत १ अब्ज ४३ कोटी ७४ लाख ४० हजार ९७७ रुपयाची धान खरेदी करण्यात आली. सदर धान खरेदीपोटी आतापर्यंत २० लाख ३ हजार ६२४ क्विंटल धानाचे ३ अब्ज ६३ कोटी ६५ लाख ७८ हजार ६६७ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. पण ३७ कोटी ७२ लाख ३२ हजार रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत.
८७ कोटींचा बोनस वितरित
खरीप हंगामात महामंडळाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रतीक्विंटल ७०० रुपयेप्रमाणे शासनाकडून बोनस दिला जातो. यंदाच्या खरीप हंगामात धानाची विक्री केलेल्या शेतकºयांना प्रतीक्विंटल ७०० रुपये प्रमाणे ८७ कोटी रुपयांचा बोनस वितरित करण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. पहिल्या यादीतील बोनस वितरणाची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
आतापर्यंत ६५ टक्के धान भरडाई
महामंडळाच्या गडचिरोली विभागीय कार्यालयामार्फत ५४ केंद्रांवरून दोन्ही हंगाम मिळून १४ लाख १९ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यापैकी ८ लाख ५० क्विंटल धान भरडाईसाठी राईस मिलवर पोहोचला. यापैकी साडेपाच लाख क्विंटल तांदूळ जमा झाला आहे. आता जवळपास साडेपाच लाख क्विंटल धान भरडाईसाठी शिल्लक आहे. यापैकी साडेचार लाख क्विंटल धान केंद्राच्या परिसरात ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आला आहे तर एक लाख क्विंटल धान गोदामात साठवून ठेवण्यात आला आहे. गडचिरोली कार्यालयामार्फत आतापर्यंत ६५ टक्के धान भरडाईची कार्यवाही करण्यात आली आहे. अहेरी कार्यालयातर्फे भरडाईची टक्केवारी ५० च्या आसपास आहे.
४ हजार ७९२
शेतकऱ्यांचे पैसे बाकी
खरीब आणि रबी हंगाम मिळून आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी कार्यालयांतर्गत महामंडळाला धान विकणाऱ्या ६१ हजार १४३ शेतकऱ्यांना २० लाख ३ हजार ६२४ क्विंटल धानाच्या चुकाऱ्यापोटी ३६३ कोटी ६५ लाख ७८ हजार रुपये देण्यात आले. मात्र ४७९२ शेतकऱ्यांचे २ लाख ७हजार ८४१ क्विंटल धानापोटी ३७ कोटी ७२ लाख रुपये देणे बाकी आहे. चुकारे दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये गडचिरोली कार्यालयांतर्गत ४३ हजार १३४ तर अहेरी कार्यालयांतर्गत १८ हजार ९ शेतकरी आहेत. बाकी असलेल्यांमध्ये गडचिरोली कार्यालयांतर्गत २१३५ तर अहेरी कार्यालयांतर्गत २६५७ शेतकरी आहेत.