३२,१७७ क्विंटल धान मोकळ्या जागेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:01 IST2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:01:00+5:30
पावसाळ्याचे दिवस असल्याने मोकळ्या जागेत झाकून ठेवलेले धान भिजण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे धान झाकण्यासाठी पुरेशी ताडपत्री देण्यात आली नाही. केवळ १० ताडपत्र्या देण्यात आल्या. जि.प.सदस्य लता पुंघाटे यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता, ही भयानक स्थिती आढळून आली.

३२,१७७ क्विंटल धान मोकळ्या जागेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरूमगाव : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत मुरूमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेअंतर्गत यावर्षी धान खरेदी करण्यात आली. परिसरातील येरकड, सुरसुंडी, सावरगाव व मुरूमगाव आदी चार केंद्रातील खरेदी मुरूमगाव येथे झाली. या सर्व केंद्राच्या गावांमधून एकूण ५६ हजार १७७ क्विंटल २१ किलो धान खरेदी करण्यात आला. खरेदी केलेल्या एकूण धानापैकी केवळ २० हजार ५५० क्विंटल धानाची उचल झाली तर ४ हजार क्विंटल धान गोदामात सुरक्षित ठेवण्यात आला. मात्र ३२ हजार १७७ क्विंटल धान मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवण्यात आला आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने मोकळ्या जागेत झाकून ठेवलेले धान भिजण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे धान झाकण्यासाठी पुरेशी ताडपत्री देण्यात आली नाही. केवळ १० ताडपत्र्या देण्यात आल्या. जि.प.सदस्य लता पुंघाटे यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता, ही भयानक स्थिती आढळून आली.
आविका संस्थेचे व्यवस्थापक बदलवा
मुरूमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेत एल.जी.धारणे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ते वयोवृद्ध झाले असून सध्या त्यांचे वय ६५ वर्षे आहे. मागील ३० ते ३५ वर्षांपासून या पदावर ते काम करीत आहेत. त्यामुळे जाहीरनामा काढून नवीन व्यक्तीची नियुक्ती येथे करावी, अशी मागणी जि.प.सदस्य लता पुंघाटे यांनी केली आहे. यावर्षी मुरूमगाव केंद्राअंतर्गत सावरगाव, मुरूमगाव, येरकड, सुरसुंडी आदी गावातील ५६ हजार १७७ क्विंटल २१ किलो धानाची खरेदी झाली. येथे साठवणुकीसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे पुंघाटे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नवीन गोदामाची व्यवस्था करावी, अशी मागणी लता पुंघाटे यांनी केली. यावेळी जाकीर कुरेशी हजर होते.