२७ पासून हत्तीरोगावर जिल्ह्यात औषधोपचार मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:31 IST2018-08-22T00:30:45+5:302018-08-22T00:31:16+5:30
हत्तीरोग दूरीकरण मोहिमेअंतर्गत येत्या २७ ते ३१ आॅगस्टदरम्यान जिल्हाभरात एक दिवसीय औषधोपचार डोज दिला जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाणार असून त्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.

२७ पासून हत्तीरोगावर जिल्ह्यात औषधोपचार मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हत्तीरोग दूरीकरण मोहिमेअंतर्गत येत्या २७ ते ३१ आॅगस्टदरम्यान जिल्हाभरात एक दिवसीय औषधोपचार डोज दिला जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाणार असून त्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.
ज्या डासांमुळे हत्तीरोगाचा संसर्ग होतो तो डास चावला असल्यास जंतूसंसर्ग होऊ नये यासाठी या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन गोळ्या देणार आहेत. हत्तीरोगाचा जंतू शरीरात असला तरी त्याचे विशिष्ट लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे सर्वांनी या गोळ्या घेतल्यास हत्तीरोगाचा संसर्ग होण्यापासून टाळले जाऊ शकते. विशेष म्हणजे ज्या भागात हत्तीरोगाची शक्यता आहे त्या भागात रक्तनमुने घेण्यासाठी येणारे कर्मचारी रात्री ८ ते १० या वेळेत येणार आहेत.
्हत्तीरोगाच्या जंतुचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमार्फत होतो. सदर डास घाण पाण्यात अंडी देतो. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, नाल्या वाहत्या करणे, डबकी बुजविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, डास उत्पत्तीच्या स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे, व्हेन पाईपला जाळी लावणे असे उपाय करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात हत्तीपाय आणि अंडवृद्धीचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य प्रमाणात जनजागृती करण्यात हा विभाग कमी पडत आहे. त्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी होत आहे.
२७९७ रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात जानेवारी ते जुलै यादरम्यान २४० गावांमध्ये अंडवृद्धीच्या रुग्णांची पाहणी, जनजागृती व शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात २८४१ रुग्ण आढळले. त्यापैकी ३९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. २७९७ रुग्ण अजूनही शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.