कारसह २५ पेट्या दारू जप्त
By Admin | Updated: July 23, 2014 00:00 IST2014-07-23T00:00:20+5:302014-07-23T00:00:20+5:30
तालुक्यातील गौरीपूर गावाजवळ चामोर्शी पोलिसांनी २५ पेट्या दारू व कार जप्त केली आहे. घोट-चामोर्शी मार्गाने अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती

कारसह २५ पेट्या दारू जप्त
चामोर्शी : तालुक्यातील गौरीपूर गावाजवळ चामोर्शी पोलिसांनी २५ पेट्या दारू व कार जप्त केली आहे.
घोट-चामोर्शी मार्गाने अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती चामोर्शी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार चामोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष गिरीगोसवी यांच्या मार्गदर्शनात कर्कापल्ली फाट्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान नोंदणी क्रमांक नसलेली पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने घोटकडून आली. पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनधारकाने पोलिसांना न जुमानताच वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता, गौरीपूर गावाजवळील जंगलामध्ये दारूने भरलेली कार सोडून तिचा चालक व साथीदार जंगलाच्या मार्गाने पसार झाले.
सदर कारची चौकशी केली असता कारमध्ये २५ पेट्या दारू आढळून आली. दारूसह वाहन चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले. या घटनेचा मुख्यसूत्रधार, अवैध दारू पुरवठादार, चालक, किरकोळ विक्रेते यांचा शोध चामोर्शी पोलीस घेत आहेत. सदर कारवाई चामोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अलोणे, सुधीर गुळकर, सतीश कत्तीवार, कुमुद भानारकर, चालक नितीन पाल यांनी केली.
चामोर्शी तालुक्याला चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी, सावली, मूल तालुक्याच्या सीमा लागून आहेत. सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात देशीदारू व बीअरबारची दुकाने आहेत. ही दुकाने चामोर्शी तालुक्यातील नागरिकांच्या भरवशावरच चालतात. हे सर्वश्रुत आहे. जिल्ह्यातही या दारू दुकानातून अवैध दारूचा पुरवठा केला जातो. यातून दारू विक्रेते गब्बर होत चालले असले तरी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
(तालुका प्रतिनिधी)