२२० जणांची चिकित्सा
By Admin | Updated: October 24, 2016 02:12 IST2016-10-24T02:12:18+5:302016-10-24T02:12:18+5:30
पोलीस विभाग, सत्य सामाजिक संस्था देवरी व आशा हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथे

२२० जणांची चिकित्सा
पोलीस विभागाचा पुढाकार : अहेरीत पोलीस जवान व कुटुंबीयांना लाभ
अहेरी : पोलीस विभाग, सत्य सामाजिक संस्था देवरी व आशा हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथे पोलीस जवान व त्यांच्या कुटुंबीयांकरिता आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात एकूण २२० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
समाजात जातीय सलोखा व शांतता राहावी, याकरिता पोलीस जवान अहोरात्र कार्यरत असतात. धावपळीचे जीवन जगत असताना त्यांचे स्वत:च्या व कुटुंबीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पोलीस विभागाच्या वतीने अहेरी येथील पोलीस संकुलात महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २२० पोलीस जवान व त्यांचे कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर शिबिर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले. या शिबिरात विविध आजारावर तज्ज्ञ चमूने मार्गदर्शन करून औषधोपचार केला. (तालुका प्रतिनिधी)
विविध आजारांवर समुपदेशन
शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, हिवताप, रक्तगट तपासणी, सिकलसेल तपासणी, क्षयरोग यासह अनेक आजारांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर संशयीत आढळलेल्या रूग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले. तसेच रूग्णांना औषधोपचार करण्यात आला. आजार दूर सारण्याकरिता नियमित औषधोपचार घेण्याचा सल्लाही वैैद्यकीय चमूकडून पोलीस जवान व त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला.