गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात आढळले २० बोगस डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:50 IST2025-07-21T18:49:48+5:302025-07-21T18:50:34+5:30
Gadchiroli : इतर तालुक्यात का शोध घेतला जात नाही

20 bogus doctors found in Etapalli taluka of Gadchiroli
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने ग्रामीण व दुर्गम भागात सर्वेक्षण केले असता सुमारे २० डॉक्टर बोगस असल्याचे आढळून आले आहे. आता या डॉक्टरांवर आरोग्य विभाग कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
एटापल्ली तालुका आदिवासीबहुल आहे. अनेक गावे घनदाट जंगलाने व्यापली आहेत. तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. नदीनाल्यांमुळे शासकीय आरोग्य यंत्रणा गावापर्यंत पोहचू शकत नाही. याचा गैरफायदा बोगस डॉक्टर घेतात. कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नसलेले डॉक्टर वेगवेगळ्या रोगांवर इलाज करतात. रुग्णाची हालत खराब होईपर्यंत त्याच्यावर बोगस डॉक्टरच औषधोपचार करतात. रुग्ण शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली असते.
कधीकधी रुग्णाचा जीव जाते. अशा अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत नियम आहेत. मात्र आरोग्य विभाग त्यांच्यावर कारवाई करीत नाही, ही शोकांतिका आहे. एटापल्लीच्या तालुका आरोग्य अधिकारी यांनी मोहीम राबवून बोगस डॉक्टरांचा शोध घेतला. असेच डॉक्टर इतरही तालुक्यात आहेत. त्यांचाही शोध घेणे आवश्यक आहे.
इतर तालुक्यात का शोध घेतला जात नाही
बोगस डॉक्टरची समस्या ही केवळ एटापल्ली तालुक्यापुरतीच मर्यादित नाही. तर ही समस्या संपूर्ण जिल्ह्यात आहे. मात्र इतर तालुक्यांमध्ये त्यांचा शोध घेतला जात नाही. ही शोकांतिका आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तसे आदेश आरोग्य यंत्रणेला द्यावेत अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. यांच्यावर थातूरमातूर कारवाई दाखविली जाते.
"आरोग्य यंत्रणेला जे डॉक्टर बोगस आढळले त्यांना सर्वप्रथम नोटीस पाठविली जाणार आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तालुकास्तरीय समिती असते. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी काही नियम आहेत. त्यानुसारच कारवाई करता येते."
- भूषण चौधरी, टीएचओ, एटापल्ली