पावसात 10 तालुके माघारले, जलसाठे अजुनही निम्मेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST2021-08-02T05:00:00+5:302021-08-02T05:00:32+5:30
जून महिन्यात २१०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. या महिन्यात २१४.८ मिमी एवढा पाऊस झाला हाेता. गडचिराेली, एटापल्ली, धानाेरा, देसाईगंज, मुलचेरा, भामरागड हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला हाेता. जुलै महिन्यात सरासरी ४२७.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र ३७९.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ८८.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे.

पावसात 10 तालुके माघारले, जलसाठे अजुनही निम्मेच
दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : १ जून ते ३१ जुलै या कालावधीत जिल्हाभरात ६३८.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते; मात्र प्रत्यक्षात केवळ ५९४.६ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या ९३.१ टक्का एवढा पाऊस झाला. विशेष म्हणजे, चामाेर्शी व सिराेंचा हे दाेन तालुके वगळले तर उर्वरित सर्वच १० तालुक्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे.
जुलै महिन्यापासून पावसाचा जाेर वाढतो मात्र मध्यंतरी बरेच दिवस पावसाने हुलकावणी दिली हाेती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानाचे राेवणे हाेऊ शकले नाही. १५ दिवसांपूर्वीपासून पावसाला सुरूवात झाली आहे. तरीही काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काही शेतकरी अजूनही पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
जून महिन्यात २१०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. या महिन्यात २१४.८ मिमी एवढा पाऊस झाला हाेता. गडचिराेली, एटापल्ली, धानाेरा, देसाईगंज, मुलचेरा, भामरागड हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला हाेता. जुलै महिन्यात सरासरी ४२७.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र ३७९.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ८८.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील तलाव केवळ ५० टक्केच भरले आहेत. त्यामुळे शेतकरी अजूनही माेठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
हलक्या धानाची मुदत संपली
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही असे शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या धानाची लागवड करतात. याला हलके धान असे संबाेधले जाते. यावर्षी जून महिन्यात अगदी सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धानाचे पऱ्हे वेळेवर टाकण्यात आले. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. परिणामी धान राेवणीला वेळेवर सुरूवात हाेऊ शकली नाही. हलक्या धानाची राेवणी पऱ्हे टाकणीपासून एक महिन्याच्या कालावधीत हाेणे आवश्यक आहे. मात्र आता दीड ते दाेन महिन्यांचा कालावधी लाेटत चालला आहे. हलके धान गर्भात येण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांनी हलके धान न राेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चार महिन्याच्या सरासरीच्या
गडचिराेली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १२५४ मिमी पाऊस पडतो. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ५९४ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या हे प्रमाण ४७.३६ टक्के एवढे आहे. म्हणजेच अजूनही ५० टक्के पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडतो. त्यानंतर मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी हाेते.