इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:10 IST2025-08-09T16:08:57+5:302025-08-09T16:10:37+5:30
Israel-Hamas war: जवळपास दोन वर्षे होत आली तरी इस्राइलने गाझामध्ये सुरू असलेले हल्ले अद्याप थांबवलेले नाही. दरम्यान, इस्राइलने गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात पॅलेस्टाईनच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार असलेल्या सुलेमान अहमद जैद अल-ओबैद याचा मृत्यू झाला आहे.

इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख
जवळपास दोन वर्षे होत आली तरी इस्राइलने गाझामध्ये सुरू असलेले हल्ले अद्याप थांबवलेले नाही. दरम्यान, इस्राइलने गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात पॅलेस्टाईनच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार असलेल्या सुलेमान अहमद जैद अल-ओबैद याचा मृत्यू झाला आहे. तो ४१ वर्षांचा होता. दक्षिण गाझामध्ये मिळणाऱ्या मदतीची वाट पाहत असतान सुलेमान अहमद जैद अल-ओबैद याचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टाइन फुटबॉल संघटनेने दिली आहे.
सुलेमान अल ओबेद याला पॅलेस्टाइनचा पेले म्हणून ओळख होती. पॅलेस्टाइन फुटबॉल संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गाझामधील खादमत अल शाती क्लबचा माजी स्टार फुटबॉलपटू असलेल्या सुलेमान अल ओबेद याने पॅलेस्टाइनसाठी २४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. तसेस फूटबॉलच्या संपूर्ण कारकिर्दीत १०० हून अधिक गोल केले होते. त्यामुळे तो पॅलेस्टाइनमधील सर्वात चर्चित खेळाडूंपैकी एक बनला होता.
सुलेमान अल ओबेद ६ ऑगस्ट रोजी दक्षिण गाझापट्टीमध्ये स्थानिकांना मिळणाऱ्या मदतीसाठीच्या रांगेत उभा होता. त्याचवेळी इस्राइलने तिथे हल्ला केला. त्यात तो मारला गेला. दरम्यान, हमासने २०२३ साली ऑक्टोबर महिन्यात केलेल्या हल्ल्यानंतर इस्राइलने गाझा पट्टीमध्ये जोरदार प्रतिहल्ले चढवण्यास सुरुवात केली होती. आता जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये काही खेळाडूंचाही समावेश आहे.