बनावट हिंगाचे शरीराला असतात धोके, जाणून घ्या कसे ओळखाल अस्सल हिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 17:05 IST2021-06-29T17:04:26+5:302021-06-29T17:05:39+5:30
अन्नपदार्थांचे व्यवस्थित पचन होण्यासाठी पारंपरिक स्वयंपाकात हिंग आवर्जून वापरलं जातं. मात्र जर तुम्ही भेसळयुक्त हिंगाचं सेवन केलं तर त्याचे तोटेही तुम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे जाणून घ्या हिंग भेसळयुक्त आहे हे कसे ओळखावे.

बनावट हिंगाचे शरीराला असतात धोके, जाणून घ्या कसे ओळखाल अस्सल हिंग
भारतीय स्वयंपाकाघरात हिंगाची डबी असतेच. हिंग निरनिराळ्या भाज्या, डाळी, खिचडीच्या फोडणीसाठी वापरलं जातं. हिंगाच्या फोडणीचा खमंग सुवास तुमची भुक आणखी चाळवतो. कारण हिंगामुळे पदार्थाला विशिष्ठ चव येते. हिंग केवळ स्वादासाठीच फोडणीत वापरलं जातं असं नाही तर त्यामागे खूप मोठं आहारशास्त्रदेखीलआहे. हिंग वापरल्यामुळे त्या पदार्थांची चव आणि पोषणमुल्यं दोन्ही वाढतात. शिवाय हिंग वापरल्यामुळे अनेक विकार तुमच्यापासून दूर राहतात. अन्नपदार्थांचे व्यवस्थित पचन होण्यासाठी पारंपरिक स्वयंपाकात हिंग आवर्जून वापरलं जातं. मात्र जर तुम्ही भेसळयुक्त हिंगाचं सेवन केलं तर त्याचे तोटेही तुम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे जाणून घ्या हिंग भेसळयुक्त आहे हे कसे ओळखावे.
कसे ओळखावे अस्सल हिंग?
अस्सल हिंगाचा रंग हलका पिवळसर असतो. तुपात हिंग टाकल्यावर हिंग फुलते व त्याचा रंग लाल होतो. असं झालं नाही म्हणजे समजाव हिंग बनावट आहे.
अस्सल हिंग पाण्यात घातल्यावर पाण्याचा रंग पांढरा होतो. असे झाले नाही तर समजावे हिंग भेसळयुक्त आहे.
अस्सल हिंग जाळल्यावर त्यातून चमकदार द्रव निघतो आणि तो लगेच जळतो. बनावट हिंगाच्या बाबतीत तसं होत नाही.
अस्सल हिंगाला हात लावून ते जर साबणाने धुतले तरी हिंगाचा वास जात नाही. जर ते हिंग बनावट असले तर हाताचा वास लगेच निघुन जातो.