मिल्कशेक आणि फ्रुट सॅलाडही हरवणारा ' शाही सफरचंद हलवा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:04 IST2018-10-02T17:00:54+5:302018-10-02T17:04:00+5:30
चवीला उत्तम आणि शाही फील देणारा सफरचंद हलवा एकदा तरी करून बघायला हरकत नाही.

मिल्कशेक आणि फ्रुट सॅलाडही हरवणारा ' शाही सफरचंद हलवा'
पुणे : फळ आणल्यावर मिल्कशेक आणि फ्रुटसॅलाड सोडून इतर पदार्थ फारसे खाल्ले जात नाहीत. विशेषतः सफरचंद तर इतर कशातही वापरण्याची पद्धत नाही. गाजर, भोपळ्याचा हलवा सर्वसाधारणपणे केला जातो. मात्र सफरचंदाचा हलवा मात्र अजूनही दुर्लक्षित आहे. चवीला उत्तम आणि शाही फील देणारा सफरचंद हलवा एकदा तरी करून बघायला हरकत नाही.
साहित्य :
किसलेले सफरचंद दोन वाटी
मावा किंवा खवा एक मोठा चमचा
एक कपभर दूध
साखर पाऊण वाटी
बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते बारीक काप (आवडीनुसार)
व्हॅनिला इसेन्स ३ थेंब
तूप दोन चमचे
मीठ चिमूटभर
टूटीफ्रूटी (सजावटीसाठी)
कृती :
- सफरचंद किसून पाण्यात घालून ठेवावे. त्यामुळे काळे पडत नाही. (साल आवडत असल्यास तेही घेऊ शकता, त्यामुळे हलवा लालसर रंगाचा आणि पौष्टिक होतो. मात्र आवडत नसल्यास सफरचंद सोलून किसावे.
- नॉनस्टिक पॅनमध्ये दोन चमचे तूप घेऊन त्यात सफरचंदाचा किस टाकून परता. तळाला चिकटू देऊ नये.
- दोन मिनिटानंतर त्यात खवा किंवा मावा टाकून मिश्रण एकजीव होईपर्यंत परता.
- दोन मिनिटे परतल्यावर त्यावर दूध टाकून एकजीव करून त्यातील ओलेपणा कमी होईपर्यंत हलक्या हाताने परतत रहा.
- या मिश्रणात चिमूटभर मीठ घाला. मिठाने हलवा रुचकर होतो.
- त्यात आता पाऊण वाटी साखर घाला. या प्रमाणात हलवा मध्यम गोड होतो. मात्र खूप गोड आवडत असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे.
- साखर विरघळायला लागल्यावर त्यात दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्स आणि ड्रायफ्रूटचे काप घालून मिश्रण बारीक आचेवर परतत रहा.
- आणि थंड झाल्यावर वाटीत हलवा सर्व्ह करा. त्यावर आवडत असल्यास टुटीफ्रुटीने सजवून सर्व्ह करू शकता. हा हलवा फ्रीजमध्ये चार दिवस टिकतो.