कारल्याच्या भाजीत 'हे' घाला, कडवटपणा होईल गायब...लागेल आणखी चविष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 18:11 IST2021-06-27T18:10:16+5:302021-06-27T18:11:09+5:30
कारले चवीला अतिशय कडवट पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. कडवटपणामुळे घरात कोणालाच कारल्याची भाजी खायला आवडत नाही. अशा वेळी काय कराल? वाच्या साध्या सोप्या टीप्स...

कारल्याच्या भाजीत 'हे' घाला, कडवटपणा होईल गायब...लागेल आणखी चविष्ट
कारले चवीला अतिशय कडवट पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. कडवटपणामुळे घरात कोणालाच कारल्याची भाजी खायला आवडत नाही. वास्तविक या भाजीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, बीटा कॅरेटीन, लोह, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फ्लेव्होनॉईड असे अनेक गुणकारी घटक असतात. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या सर्व घटकांशी शरीराला गरज असते.
का खावी कारल्याची भाजी?
आजारपणापासून दूर राहू शकता. सध्या कोरोनाच्या काळात प्रतिकार शक्ती मजबूत करण्याची गरज आहे. शिवाय ज्यांना मधुमेह अथवा सांधेदुखी आहे अशा लोकांसाठीही कारले फायदेशीर ठरते. शिवाय या भाजीमुळे तुमची पचनशक्ती सुधारते. कारल्याचा रस पिण्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होतात. पण जर तुम्हाला कारले कडू लागते म्हणून आवडत नसेल तर काही टिप्स फॉलो करून तुम्ही कारल्याचा कडूपणा कमी करू शकता. यासाठी जाणून घ्या कारल्याचा कडूपणा कसा कमी करावा.
कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स:
- सर्वात महत्त्वाची आणि पारंपारिक टिप म्हणजे कारली चिरून घेताना त्यात मीठ घालून ती पिळून घेणे. यामुळे कारल्यातील सर्व कडूपणा कमी होतो.
- कारले स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यावरील काटेरी भाग चाकूने काढून टाका. यामुळे तुम्ही केलेली कारल्याची भाजी कमी कडू लागेल
- कारल्याची भाजी केल्यावर ती परतून गॅस बंद करण्यापूर्वी त्या भाजीत थोडा गुळ टाका. गुळाचा गोडवा कारल्याचा कडूपणा कमी करेल.
- कारल्याचा कडूपणा हा त्याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असतो. यासाठी भाजी करताना अथवा कारल्याचा ज्युस करताना कारलं सोलून त्यामधील बिया काढून टाका.
- कारल्याची भाजी करताना ती तव्यावर चांगली परतून घ्या. या पद्धतीने भाजी कोरडी होईल त्यामधील रस सुकून गेल्यामुळे आणि कारली चांगली परतली गेल्यामुळे त्याचा कडूपणा कमी होईल.
- कारल्याची भाजी करताना कारली स्वच्छ धुवून, चिरून दह्यात मॅरिनेट करा. ज्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. मात्र काही जण कारल्यासोबत दही खाऊ नये असा सल्ला देतात. त्यामुळे या गोष्टींचा नीट विचार करून कारलं दह्यासह खा.
- भाजीसाठी कारल्याच्या फोडी चिरून आणि पिळून घेण्यापूर्वी त्यात मीठासोबत थोडी साखर आणि व्हिनेगर वापरा. ज्यामुळे भाजी कडू होणार नाही.
- कारली गरम पाण्यात उकडल्यामुळे कारल्याचा कडूपणा काही प्रमाणात नक्कीच कमी होतो.
- कारले सोलून त्याला कणीक आणि मीठ लावून ठेवावे आणि मग ते धुवून घ्यावे
- कारले उभे चिरून तांदळाच्या पाण्यात भिजत ठेवल्यास कारल्याचा कडूपणा कमी होतो.
- कारले मसाले टाकून परतावे आणि त्यात शेंगदाण्याचा कुट टाकावा ज्यामुळे कारल्याची भाजी कडू होत नाही.
- कारले कमी कडू लागावे यासाठी कारल्याच्या भाजीत आमचूर पावडर टाका.