कपूर कुटुंबाची सून होण्याआधी गौतमी गाडगीळचा झालेला घटस्फोट; कोण आहे तिचा पहिला नवरा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 03:49 PM2024-02-27T15:49:06+5:302024-02-27T16:15:27+5:30

'बिंधास्त गर्ल' मराठी अभिनेत्री गौतमी गाडगीळच्या पहिल्या घटस्फोटापासून ते राम कपूरशी लग्नापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

मराठमोळी अभिनेत्री गौतमी गाडगीळ (Gautami Gadgil Kapoor) आठवतेय का? टीव्ही अभिनेता राम कपूरीशी लग्न झाल्यानंतर गौतमी कपूर हीच तिची ओळख बनली. 'बिंधास्त' या मराठी सिनेमातील तिच्या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. या सिनेमातून तिला 'बिंधास्त गर्ल' अशीच ओळख मिळाली होती.

गौतमीने मराठीशिवाय हिंदीत जास्त काम केलं. तिने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. 'घर एक मंदिर'मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिने 'धडकन','क्यूँकी साँस भी कभी बहू थी','कबूल है','तेरे शहर मे' सारख्या हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या.

मालिकांव्यतिरिक्त गौतमीने हिंदी सिनेमांमध्येही नशीब आजमावलं. तिने 'कुछ ना कहो','फना','स्टुडंट ऑफ द इयर','शादी के साईड इफेक्ट्स','लेकर हम दीवाना दिल','सत्यमेव जयते 2' या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या.

गौतमीची लोकप्रिय मालिका 'घर एक मंदिर' मध्येच तिला तिचा जीवनसाथी मिळाला. त्याचं नाव राम कपूर. राम कपूरही टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा. या मालिकेत गौतमी रामच्या वहिनीच्या भूमिकेत होती. 2000 ते 2002 असे दोन वर्ष ही मालिका चालली. मालिकेच्या सेटवरच गौतमी आणि राम कपूर यांची लव्हस्टोरी सुरु झाली.

राम आणि गौतमी एकमेकांच्या अगदीच विरुद्ध होते. गौतमी एकदम फिटनेसकडे लक्ष देणारी, सुंदर अभिनेत्री.तर राम कपूरचं वजन किती जास्त होतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र तरी दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मालिका संपताच 2003 साली व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच त्यांनी लग्न केले.

खूप कमी जणांना माहित असेल पण रामसोबत लग्न करण्याच्या आधी गौतमीचा घटस्फोट झाला होता. तिचं पहिलं लग्न प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर मधुर श्रॉफसोबत झालं होतं. मात्र लग्नानंतर त्यांच्यात मतभेद सुरु झाले आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

मधुर श्रॉफ गेल्या ३० वर्षांपासून फोटोग्राफी क्षेत्रात आहेत.त्यांनी 2000 पेक्षा जास्त जाहिराती कँपेन आणि असाईन्मेंट्स केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी उत्तमोत्तम फोटो काढले आहेत.

तर दुसरीकडे गौतमी आणि राम कपूरचा सुखी संसार सुरु आहे. त्यांच्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण झाली आहेत. २००६ साली गौतमीने मुलीला जन्म दिला. तिचं नाव 'सिया' आहे तर २००९ साली त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव 'अक्स' ठेवण्यात आलं.

गौतमी 49 वर्षांची असून तिच्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. याही वयात ती कमालीची सुंदर दिसते. तिचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात.