साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 06:20 IST2026-05-19T06:20:32+5:302026-05-19T06:20:46+5:30
पालघरमध्ये अपघातात साखरपुड्याला जाणारे २५ जण जखमी

साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेरनमध्ये भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये जवळपास ६० वऱ्हाडी होते. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
धानिवरी खडकीपाडा येथे जात असताना वऱ्हाडी मंडळींनी भरलेला आयशर ट्रक आणि कंटेनरमध्ये झालेल्या या भीषण अपघातात एक दुचाकी देखील चिरडली गेली. डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून हे वऱ्हाड धानिवरी येथे जात असताना हा अपघात झाला.
अपघातातील जखमींना तातडीने कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून, यामधील गंभीर जखमींना धुंदलवाडी येथील वेदांत आणि गुजरातमधील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
मृतांची नावे अशी
सुरेश रत्ना लाखात, पांडू गणपत लाखात, कलू गोविंद लाखात, सुनील अर्जन दांडेकर, चिमा गोविंद कुर्हाडा, नमिता विठ्ठल दांडेकर, सारिका संतोष लाखात, आयुष सिताराम लाखात, सागर नामदेव शेंडे, वंदना शिवराम वळवी, सलोनी शिवराम वळवी, अजय चंद्रा आहाडी, रीयांशी संतोष लाखात
आनंदावर क्षणार्धात दु:खाचे विरजण
ट्रकमधील वऱ्हाडी मंडळींमध्ये आनंदाचे वातावारण होते. मात्र, कंटेनरची धडक बसल्याने ट्रक पलटी झाला अन् किंकाळ्या व आक्रोश तसेच रडण्याचे आवाज ऐकू यायला लागले. ते ऐकून महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी बचावासाठी प्रयत्न केले.
स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले. पाेलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली.
कंटेनरखाली सापडून अनेक वऱ्हाडी जखमी
कंटेनर मुंबईहून येत होता. त्यावेळी या कंटेनरची ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कंटेनरचा पुढील भाग वेगळा होऊन ट्रकवर पडला. त्यामुळे वऱ्हाडी कंटेनरखाली सापडली. पालघरचे खा. डॉ. हेमंत सवरा यांनी घटनास्थळी पाहणी केली. ही घटना अतिशय दुर्देवी असल्याचे ते म्हणाले. जखमींना तातडीने मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत : मुख्यमंत्री
अपघाताची घटना ऐकून अतिशय दु:ख झाले. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.