मुन्नीसाठी वेडा झालेला 'मुंज्या'! मराठी दिग्दर्शकाचा हॉरर बॉलिवूड सिनेमा, भयानक टिझर पाहून झोप उडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 12:56 IST2024-05-21T12:55:47+5:302024-05-21T12:56:09+5:30

'मुंज्या' असं या सिनेमाचं नाव असून नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे. 

aditya sarpotdar directed munjya horror bollywood movie teaser release watch | मुन्नीसाठी वेडा झालेला 'मुंज्या'! मराठी दिग्दर्शकाचा हॉरर बॉलिवूड सिनेमा, भयानक टिझर पाहून झोप उडेल

मुन्नीसाठी वेडा झालेला 'मुंज्या'! मराठी दिग्दर्शकाचा हॉरर बॉलिवूड सिनेमा, भयानक टिझर पाहून झोप उडेल

हॉरर सिनेमा म्हटलं की डोळ्यासमोर हिंदीतील काही मोजक्या सिनेमांची नावं येतात. 'राज', 'कृष्णा कॉटेज', 'भूत', 'भेडियां', 'स्त्री' हे हिंदीतील गाजलेले हॉरर सिनेमे आहेत. आता आणखी एक हॉरर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मुंज्या' असं या सिनेमाचं नाव असून नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे. 

'मुंज्या' या हॉरर सिनेमाचा १.२३ मिनिटांचा भयानक टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरच्या सुरुवातीला जंगलातील एक पिंपळाचं झाड दाखविण्यात आलं आहे. या झाडातून मुंज्या नावाची एक विकृत दिसणारी आकृती बाहेर येते. 'मुन्नी बदनाम हुई' हे मलायका अरोराचं गाणं ऐकताच मुंज्या बाहेर येत असल्याचं टीझरमध्ये दिसत आहे. मुन्नीसाठी वेडा झालेला हा मुंज्या त्या गाण्याच्या दिशेने पळत शहरात येत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर जिथे हे गाणं लागलेलं असतं तिथे तो पोहचतो. त्यानंतर टीव्ही बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'मुन्नी बदनाम हुई' गाणं बंद होताच मुंज्या घरात शिरल्याचं दिसत आहे. त्यानंतर घरातील व्यक्तींचा कानठळ्या बसवणारा आक्रोश ऐकू येत आहे. 

'मुंज्या'चं मुन्नीशी नेमकं काय कनेक्शन आहे? याचा अंदाज मात्र टीझरमधून लावता येत नाही. पण, हा टीझर नक्कीच उत्कंठा वाढवणारा आहे. 'मुंज्या' सिनेमाच्या टीझरमुळे प्रेक्षकांची सिनेमासाठीची उत्सुकता वाढली आहे. 'स्त्री' या सिनेमाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून मुंज्या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

'मुंज्या' सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. 'झोंबिवली' या मराठी सिनेमानंतर आदित्य सरपोतदार पुन्हा मुंज्या हा हॉरर सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमात मोना सिंग, अभय वर्मा, शर्वरी अशी स्टारकास्ट दिसणार आहे. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार असून ७ जूनला 'मुंज्या' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: aditya sarpotdar directed munjya horror bollywood movie teaser release watch