Video: पंच्याहत्तरी पार तरीही उत्साह अपार! नाना पाटेकर यांचा जिममधील व्हिडीओ पाहून चाहते अवाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:16 IST2026-04-30T12:09:26+5:302026-04-30T12:16:20+5:30
नाना पाटेकरांचा जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नानांना या वयात कसून व्यायाम करताना पाहून चाहते अवाक झाले आहेत.

Video: पंच्याहत्तरी पार तरीही उत्साह अपार! नाना पाटेकर यांचा जिममधील व्हिडीओ पाहून चाहते अवाक
अभिनेते नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते. नानांना आपण विविध सिनेमांतून अभिनय करताना पाहिलंय. वयाची ७५ वर्ष ओलांडली तरीही नाना पाटेकर त्यांच्या फिटनेसबद्दल कमालीचे आग्रही असतात. अशातच नाना पाटेकरांचा जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नानांना या वयात कसून व्यायाम करताना पाहून चाहते अवाक झाले आहेत.
प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी इन्स्टाग्रामवर नाना पाटेकर यांचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अतुल कसबेकर यांनी पोस्ट केलेल्या रीलमध्ये नाना पाटेकर शॉर्ट्स आणि पांढरी बनियान अशा साध्या पेहरावात दिसत आहेत. वयाच्या ७६ व्या वर्षीही नाना अत्यंत सहजतेने 'ट्रायसेप डिप्स' (Tricep Dips) मारताना दिसत आहेत. व्यायाम पूर्ण केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी दिसतो.
अतुल यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "अहो नाना साहेब...!!! तुम्ही मला माझे फिटनेस गोल्स पुन्हा एकदा तपासायला भाग पाडले आहे. नाना पाटेकर ७६ वर्षांचे आहेत आणि त्यांनी १५ डिप्स मारले (मी रेकॉर्डिंग उशिरा सुरू केले होते). कधीकधी मला आळस येतो, पण नाना साहेबांकडे पाहून पुन्हा जोमाने कामाला लागावेसे वाटते. काय अद्भूत व्यक्तिमत्व आहे!"
हा व्हिडीओ पाहून यावर सोशल मीडियावर काही रंजक चर्चाही पाहायला मिळाल्या. एका युजरने कमेंट केली की, "शुद्ध शाकाहारी असूनही ते इतके फिट आहेत." यावर अतुल कसबेकर यांनी उत्तर दिले की, "मला तुम्हाला सांगायला दुःख होत आहे की ते शाकाहारी नाहीत. मी त्यांच्या घरी आताच दुपारचे जेवण केले आहे." एका चाहत्याने सांगितले की, "नानांना स्वतः स्वयंपाक करायला आणि मासे खायला खूप आवडते. ते खरोखरच 'लेजेंड' आहेत." ७६ व्या वर्षी नानांचं व्यायामाबद्दलचं हे प्रेम पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय.