काय आहे गोरिल्ला ग्लास !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 15:07 IST2016-12-16T15:07:28+5:302016-12-16T15:07:28+5:30
स्मार्टफोन घेताना विशेषत: मोठा स्क्रीन, चांगले रिझुल्युशन, पिक्चर क्वॉलिटी तसेच स्क्रीनच्या ग्लासचा टिकाऊपणा आदी घटक आवर्जून पाहिले जातात. त्या अनुषंगाने स्मार्टफोन, टॅब्लेटच्या स्क्रीनमध्येही नवीन तंत्रज्ञानावर आधारित बदल होत असून, स्क्रीन ग्लास अधिकाधिक मजबूत होत जातेय आणि सध्या असणाऱ्या बहुतांश स्मार्टफोन्समध्ये असणारी भक्कम स्क्रीन म्हणजे गोरिल्ला ग्लास.

काय आहे गोरिल्ला ग्लास !
स्मार्टफोन घेताना विशेषत: मोठा स्क्रीन, चांगले रिझुल्युशन, पिक्चर क्वॉलिटी तसेच स्क्रीनच्या ग्लासचा टिकाऊपणा आदी घटक आवर्जून पाहिले जातात. त्या अनुषंगाने स्मार्टफोन, टॅब्लेटच्या स्क्रीनमध्येही नवीन तंत्रज्ञानावर आधारित बदल होत असून, स्क्रीन ग्लास अधिकाधिक मजबूत होत जातेय आणि सध्या असणाऱ्या बहुतांश स्मार्टफोन्समध्ये असणारी भक्कम स्क्रीन म्हणजे गोरिल्ला ग्लास. या गोरिल्ला ग्लासबाबत सध्या जास्तच उत्सुकता दिसून येत आहे. आजच्या सदरात नेमका गोरिल्ला ग्लास काय आहे, याबाबत जाणून घेऊया.
सर्वच स्मार्टफोन टच स्क्रीनचे असल्याने टचस्क्रीनमध्ये व्यत्यय येऊ नये तसेच स्मार्टफोन जड होऊ नये यासाठी कॉर्निग कंपनीने काच मुद्दाम पातळ तयार केली आहे. स्क्रॅच आणि इम्पॅक्ट रेझिस्टंट या दोन वैशिष्ट्यांमुळे जवळपास सर्वच स्मार्टफोन्समध्ये या काचेचा वापर सध्या केला जात आहे.
इतर प्रकारच्या काचा बनविताना वाळू (सिलिकॉन डायआॅक्साइट), लाइमस्टोन (चुनखडी दगड) आणि सोडियम कॉर्बोनेटचा वापर केला जातो. गोरिल्ला ग्लास बनविताना विशेषत: याच घटकांचा वापर केला जातो. मात्र सिलिकॉन डायआॅक्साइडसोबत इतर दोन रसायनं मिसळली जातात आणि त्यातून तयार झालेली वितळलेल्या रूपातली काच म्हणजे अॅल्युमिनोसिलिकेट. ही काच एका विशेष प्रकारच्या टाकीमध्ये ओतली जाते आणि रोबोटिक आर्मच्या मदतीने तिच्या शीट्स तयार केल्या जातात. गोरिल्ला ग्लासचे रहस्य म्हणजे आयन एक्स्चेंज ही रासायनिक प्रक्रियाचे कोअर रसायनशास्त्र आहे. पहिल्या फेजमध्ये तयार झालेली अॅल्युमिनोसिलिकेटची ग्लास पुढल्या टप्प्यात पोटॅशियम आयनमध्ये बुडविली जातात. यालाच रासायनिक भाषेत पोटॅशिअम आयनची अंघोळ असं म्हणतात. या प्रकियेत या काचेमध्ये असणाऱ्या सोडियम आयनची जागा पोटॅशियम घेतात. पोटॅशियम आयन्सनी कम्प्रेस झालेली अॅल्युमिनोसिलिकेट तयार होते. या अशा अंघोळीमुळे या काचेची मजबुती वाढते. विशेष म्हणजे काचेची ताकद वाढवण्यासाठीच पोटॅशियमचा वापर करण्यात येतो. या काचेवर स्क्रॅच पडत नाहीत. तसंच विशिष्ट अपवाद सोडल्यास मोबाइल पडला तरी ही काच फुटत नाही. अर्थात जोरात आपटला किंवा मोबाइलवर एखादी अवजड वस्तू पडली तर काच नक्कीच तुटू शकतो. या ग्लासचे वैशिष्ट्ये म्हणजे हा ग्लास रिसायकलेबल, म्हणजेच त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. काही मोबाइल कंपन्यांच्या मते दोनतृतीयांश मोबाइल हे साधारण कमरेच्या उंचीवरून खाली पडतात. आणि म्हणूनच त्यांची काच किंवा स्क्रीनला तडे जातात. हे प्रमाण कमी करण्यासाठीच गोरिल्ला ग्लासची निर्मिती करण्यात आली. अर्थात गोरिल्ला ग्लास ही लोकप्रिय झालेलं उत्पादन आहे. याशिवाय सफायर क्रिस्टल ग्लास किंवा क्वार्ट्झ ग्लाससारखी अधिक उत्तम उत्पादनेही आहेत.
गोरिल्ला ग्लास मजबूत असली तरी स्क्रीन तुटण्याच्या अनेक घटना घडतातच. त्यामुळे त्याऐवजी सफायर क्रिस्टल ग्लासचा वापर करावा असा काहीजण सल्लाही देतात. सफायर क्रिस्टल ग्लास ही खरोखरच गोरिल्लापेक्षा मजबूत आहे. मात्र ही काच वाकत असल्याने ती त्यामुळे तुटते. म्हणूनच तिचा जास्त वापर केला जात नाही. आणि क्वार्ट्झ ग्लास मजबूत असला तरी त्याचे उत्पादन खर्चीक आहे. म्हणून स्वस्त आणि मस्त अशा वैशिट्यपूर्ण गोरिल्ला ग्लासलाच बहुतेक स्मार्टफोन कंपन्या पसंती देताना दिसतात.