-सारिका पूरकर-गुजराथी
घरातील सोफा किंवा अन्य सिटिंग अरेंजमेंट कितीही छान असू देत पण सेंटर टेबल नसेल तर त्यांची शान अधुरी असते. हा सेंटर टेबल घर सजावटीतील एक महत्वाचा घटक आहे. पूर्वी केवळ टिपॉय म्हणून चार लाकडी पाय असलेला, सनमायका लावलेला टिपॉय घराघरात ठेवला जात होता. आता मात्र या सेंटर टेबलचंही रुप पालटलं आहे. अनेक आकारात, प्रकारात हे सेंटर टेबल्स उपलब्ध आहेत. पण आपल्या घराला, फर्निचरलाही ते शोभायला हवेत. असे सेंटर टेबल निवडायचे असतील तर ..!
सेंटर टेबल कसा निवडाल?
१) फर्निचरमधील सर्वात मोठा पीस जो असेल त्याच्या आकारापेक्षा २/३ पेक्षा कमी आकारात सेंटर टेबल असायला हवा. तसेच सोफ्याच्या उंचीइतकाच उंच किंवा त्यापेक्षा दोन इंचांनी कमी उंचीचा असायला हवा.
२) फर्निचर लाकडी असेल तर लाकडी सेंटर टेबलच हवा. पारंपरिक लूक हवा असेल तर सध्या खूप प्रकार उपलब्ध आहेत. राजस्थानी फर्निचर डिझाईन्समध्ये फायबरच्या स्त्री-पुरुषांच्या मूर्तींवर काच लावून केलेला सेंटर टेबलही लोकप्रिय आहे. सोफा जर लेदर किंवा अन्य फेब्रिकमधील असेल तर खूप पर्याय आहेत. मेटलचे पाय व त्यावर काच, लाकडी पाय आणि त्यावर विविध आकारात काच असलेला सेंटर टेबलही मस्त पर्याय आहे. ट्रॉली सेंटर टेबलही वापरला जातो. क्लासिक लूक हवा असेल तर लाकडी सेंटर टेबल बेस्ट आहे, कंटेपररी लूक हवा असेल तर मग भौमितीय आकारांची रचना असलेले टेबल्स सूट होतील. ३)एल आकाराचा सोफा असेल तर शक्यतो आयताकृतीच सेंटर टेबल हवा. दिवाणखान्याचा आकार आणि फर्निचर यावर याचा आकार ठरवा. हॉल मोठा असेल, खूप मोठा सोफा असेल तर सध्या दोन सेंटर टेबल ठेवण्याचा ट्रेण्ड आहे. बाल्कनीत, लॉन्सवर किंवा फायरवॉलशेजारी ठेवायचा असेल तर गोलाकारातील, थोड्या लहान आकारातील सेंटर टेबल शोभून दिसतो. जर हे तेच ते आकार नको असतील तर ओव्हल शेपचा टेबल ट्राय करा, त्याच्या भोवती ओट्टोमन ठेवा.एकदम मस्त दिसतं हे कॉम्बिनेशन. ४)सेंटर टेबल फक्त चहा-कॉफीचे मग ठेवण्यासाठी नसतो तर तो एक चांगला स्टोअरेज पर्यायही आहे. सेंटर टेबलला जर ड्रॉवर्स असतील तर त्यात तुम्ही पुस्तकं, वर्तमानपत्रं, रिमोट कंट्रोल्स, नॅपकिन्स ठेवू शकता. यादृष्टीनंही सेंटर टेबलची निवड करणं फायदेशीर ठरतं.
सेंटर टेबलची अरेंजमेट करताना..
१) सेंटर टेबल मोठा असेल तर त्यावर एखाद-दोन तुमच्या आवडीचे पुस्तके मांडा. त्यामुळे टेबललाही एक मॅच्युअर्ड लूक येईल. छोटा फ्लॉवर वासे शेजारी ठेवला तर आणखी नजाकत वाढेल.
२) काही वेळेस सेंटर टेबलवर सुगंधित कॅण्डल्स मांडून ठेवा. सायंकाळी कॅण्डल लाईट वातावरण प्रसन्न करेल.
३) काही शिल्पं यावर मांडता येतील. परंतु आकारानं मोठी नकोत.
४) कॅक्टस, काही पान वनस्पतींची रचनाही सेंटर टेबलवर छान दिसते. तसेच गोलाकार टेबलवर चौकोनी ट्रे ठेवून त्यात फ्लॉवरपॉट मांडून हटके लूक ट्राय करता येतो.
५) सुंदर टेबलक्लॉथ अंथरुन सेंटर टेबल अधिक आकर्षक दिसू शकतो. त्यासाठीही असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.
६) काचेचे सेंटर टेबल असतील तर त्याखाली छानसा रग अंथरा. यामुळे सेंटर टेबल अजूनच खुलून दिसतो.