Fact Check: कांद्याचा रस प्यायल्याने कमी होतं ब्लड प्रेशर?; जाणून घ्या, नेमकं काय आहे 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:46 IST2025-01-28T17:42:34+5:302025-01-28T17:46:59+5:30
Fact Check: कांद्याचा रस प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होतं असा दावा करणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल झाला आहे.

Fact Check: कांद्याचा रस प्यायल्याने कमी होतं ब्लड प्रेशर?; जाणून घ्या, नेमकं काय आहे 'सत्य'
Created By: News Meter
Translated By: ऑनलाईन लोकमत
कांद्याचा रस प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होतं असा दावा करणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ३० दिवस दिवसातून दोनदा म्हणजेच एकदा उपाशी पोटी आणि जेवणानंतर तीन तासांनी कांद्याचा रस पिण्याची शिफारस केली आहे.
न्यूजमीटरला असं आढळून आलं की, हा दावा दिशाभूल करणारा आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं की, केवळ कांद्याचा रस प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होऊ शकत नाही.
कामिनेनी हॉस्पिटलमधील जनरल फिजिशियन डॉ. श्रीकृष्ण राघवेंद्र बी म्हणाले, रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की कांद्यामधील काही कम्पाऊंड विशेषत: क्वेरसेटिन यांचे हायपोटेन्सिव्ह परिणाम होऊ शकतात. क्लिनिकल चाचण्यांमधून व्यक्तींच्या ब्लड प्रेशर लेव्हलवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. कांद्याच्या रसाचे ब्लड प्रेशरवर होणारे परिणाम सर्वत्र स्वीकारले जात नाहीत आणि यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात अभ्यास आवश्यक आहे.
अनेक पारंपारिक औषध पद्धती हाय ब्लड प्रेशरसह आरोग्य स्थिती व्यवस्थापित करण्यासाठी कांद्यासारख्या नैसर्गिक पदार्थांच्या वापराचं समर्थन करतात. असं मानलं जातं की, नैसर्गिक पदार्थांचे चांगलेच फायदे होतात.
कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात.
या दाव्याला समर्थन देण्यासाठी काही अभ्यास असले तरी, पुरावे निर्णायक नाहीत. म्हणून, हायपरटेन्शन मॅनेज करण्यासाठी सामान्यतः एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक असतो, ज्यामध्ये योग्य आहार, व्यायाम आणि कधीकधी औषधांचा समावेश असतो. इतर घटकांचा विचार न करता केवळ कांद्याच्या रसावर लक्ष केंद्रित केल्याने लक्षणीय परिणाम मिळू शकत नाहीत असं डॉ. श्रीकृष्ण राघवेंद्र यांनी म्हटलं आहे.
कांद्याचा रस त्याच्या क्वेरसेटिन सामग्रीमुळे फायदेशीर असू शकतो, परंतु हाय ब्लड प्रेशरसाठी तो एक स्वतंत्र उपचार म्हणून पाहू नये. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करणे हा ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असं देखील डॉ. श्रीकृष्ण राघवेंद्र यांनी म्हटलं आहे.
(सदर फॅक्ट चेक News Meter या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)