Fact Check : सेलिब्रेशनचा व्हिडीओ अफगाणिस्तानचा, पण त्याचा भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याशी काहीही संबंध नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:44 IST2025-03-11T15:42:02+5:302025-03-11T15:44:27+5:30
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अफगाणिस्तानमधील एका सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भारताच्या विजयाचा जल्लोष केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Fact Check : सेलिब्रेशनचा व्हिडीओ अफगाणिस्तानचा, पण त्याचा भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याशी काहीही संबंध नाही
Created by: आज तक
Translated by: ऑनलाइन लोकमत
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर भारतात मोठ्या उत्साहात आनंद साजरा करण्यात आला. पण, आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अफगाणिस्तानमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे.अफगाणिस्तानच्या लोकांनी भारताच्या विजयाचा जल्लोष रस्त्यावर उतरुन उत्साहात साजरा केल्याचा दावा करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या क्लिप्स जोडण्यात आल्या आहेत. यात अनेक लोक फटाके फोडत आनंद साजरा करत असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी पोस्ट शेअर करत या कॅप्शनमध्ये, अफगाणिस्तानची राजधानी काबुल मध्ये भारताच्या विजयाचा आनंद साजरा केल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांनी भारतीयांच्या विजयाचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केल्याचे म्हटले आहे. सर्व फुटेज पाकिस्तानी माध्यमांमध्ये दाखवले जात आहेत आणि लोकांना अभिमान वाटत आहे की विरोधी देश असूनही, भारताने मुस्लिम अफगाणांना आपले मित्र बनवले आहे."
या कॅप्शनसह हा व्हिडीओ फेसबुक आणिएक्सवर खूप शेअर केला जात आहे.
पण, आज तक फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की या सेलिब्रेशन व्हिडिओचा भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याशी काहीही संबंध नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवल्यानंतर अफगाणिस्तानात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सत्यता कशी पडताळली?
व्हायरल व्हिडिओमध्ये '@zekria.zeer' या इंस्टाग्राम हँडलचा वॉटरमार्क दिसत आहे. हा व्हिडीओ २७ फेब्रुवारी २०२५ रोजी या हँडलवर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाशी संबंधित असू शकत नाही कारण तो आधीच इंटरनेटवर उपलब्ध आहे, यावरुन हे सिद्ध होते.
इंस्टाग्राम पोस्टमधील व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनवरून असे समजते की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवले तेव्हा हा आनंद अफगाणिस्तानात साजरा झाला होता.'@zekria.zeer' नावाचा हा वापरकर्ता देखील अफगाणिस्तानचा आहे. या प्रोफाइलच्या बायोमध्ये लिहिले आहे की झेकरिया हे एक छायाचित्रकार आहेत आणि ते अफगाणिस्तानातील जलालाबादचे रहिवासी आहेत.
या व्हिडिओबद्दल आम्ही झकारियाशीही बोललो. ते म्हणाले की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवल्यानंतर जलालाबादच्या रस्त्यांवर जल्लोष झाला. हा व्हिडीओ त्याने शूट केलेल्या त्याच सेलिब्रेशनचा आहे.
हा सामना २६ फेब्रुवारी रोजी लाहोर येथे खेळला होता. यामध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला ८ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अफगाणिस्तानात काही सेलिब्रेशन झाले की नाही हे आपण येथे सांगू शकत नाही पण व्हायरल होणारा व्हिडीओ अशा कोणत्याही सेलिब्रेशनचा नाही.
(सदर फॅक्ट चेक आज तक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)