कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:10 IST2025-07-23T15:09:37+5:302025-07-23T15:10:07+5:30
जगविख्यात आयटी कंपनीने मानवी विष्ठेसाठी १४ हजार कोटी रुपये मोजले आहेत. यासाठी बिल गेट्स यांच्या कंपनीने 'व्हॉल्टेड डीप' नावाच्या कंपनीसोबत २०३८ पर्यंत करार केला आहे.

कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
ऐकायला अजब वाटेल, परंतू मायक्रोसॉफ्ट या जगविख्यात आयटी कंपनीने मानवी विष्ठेसाठी १४ हजार कोटी रुपये मोजले आहेत. यासाठी बिल गेट्स यांच्या कंपनीने 'व्हॉल्टेड डीप' नावाच्या कंपनीसोबत २०३८ पर्यंत करार केला आहे. मायक्रोसॉफ्ट आपल्या डेटा सेंटरमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडच्या समुळ उच्चाटनावर काम करत आहे. याचाच भाग म्हणून ही विष्ठा वापरली जाणार आहे.
मायक्रोसॉफ्ट-व्हॉल्टेड डीप यांच्या करारानुसार ही कंपनी पुढील १२ वर्षांत तब्बल ४९ लाख टन कार्बन डायऑक्साईड कायमचा नष्ट करणार आहे. व्हॉल्टेड डीप या कंपनीकडे असे तंत्रज्ञान आहे जे मानवी विष्ठा, शेण आणि इतर गोष्टींपासून कार्बन नष्ट करते. या तंत्रज्ञानाने कार्बन नष्ट करण्याचा अपेक्षित खर्च हा प्रति टन ३० हजार रुपये आहे. जमिनीमध्ये खोलवर हा जैविक कचरा साठवून त्याद्वारे निर्माण होणाऱ्या गॅसेसचा वापर करत हा कार्बन नष्ट केला जाणार आहे.
या कचऱ्यामध्ये बायोसॉलिड्स (जे मानवी विष्ठेचे घन स्वरूप आहे), प्राण्यांचे शेण (खत), कागदी गाळ आणि अन्न आणि शेतीतून उरलेला कचरा यांचा समावेश असेल. मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे की यामुळे हवामानाला लगेचच फायदा होईल. डेटा सेंटरमधून उत्सर्जित होणारा प्रचंड कार्बन कमी करण्यासाठी असे प्रकल्प खूप महत्वाचे आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी, गुगल आणि अमेझॉन सारख्या अनेक मोठ्या कंपन्या देखील हरित ऊर्जा स्रोतांमध्ये गुंतवणूक करत आहेत.
कशी आहे पद्धत...
जैविक कचरा जमिनीखाली हजारो फूट खोलवर असलेल्या खडकांच्या थरांमध्ये इंजेक्ट केला जातो. तो द्रव स्वरुपात साठविला जातो. या पद्धतीमुळे मिथेन उत्सर्जन कमी होते आणि घातक वायू हवेत मिसळत नाहीत. म्हणजेच डेटा सेंटर्समधून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड प्रत्यक्ष नष्ट होणार नाही, तर तेवढ्याच प्रमाणातील विषारी वायू जो इतर कचऱ्यापासून तयार होणार होता, तो नष्ट केला जाणार आहे. २००८ पासून ही कंपनी यावर काम करत असून अमेरिकेत या प्रक्रियेला परवानगी आहे. मायक्रोसॉफ्टच्या या करारामुळे पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईडचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे.