सह्याद्रीत आढळल्या गोगलगायींच्या दोन नव्या प्रजाती; दाजीपूर, आंबोलीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 08:08 PM2021-07-01T20:08:44+5:302021-07-01T20:14:00+5:30

environment Wildlife : पश्चिम घाटात या आठवड्यात संशोधकांना गोगलगायीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लागला असून, सह्याद्रीतील जैवविविधता आणखीन समृद्ध झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये एका, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे एका गोगलगायींची नवीन प्रजात आढळली आहे. ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन आणि डॉ. अमृत भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सह्याद्रीतील गोगलगायी या प्रकल्पामधील हे संशोधन आहे.

Two new species of snails found in Sahyadri; Including Dajipur, Amboli | सह्याद्रीत आढळल्या गोगलगायींच्या दोन नव्या प्रजाती; दाजीपूर, आंबोलीचा समावेश

राधानगरी अभयारण्याच्या दाजीपूर वनपरिक्षेत्रामधील उगवाई देवी मंदिर परिसरातील देवराईमध्ये आढळलेली पेरोटेटिया राजेशगोपाली ही गोगलगाईंची ही नवीन प्रजात, इन्सेटमध्ये संशोधक डॉ. अमृत भोसले.

googlenewsNext
ठळक मुद्देसह्याद्रीत आढळल्या गोगलगायींच्या दोन नव्या प्रजाती; दाजीपूर, आंबोलीचा समावेशकऱ्हाड, कोल्हापूरच्या संशोधकांचा सहभाग, आंबोलीतील गोगलगायीला वरद गिरींचे नाव

संदीप आडनाईक

कोल्हापूर : पश्चिम घाटात या आठवड्यात संशोधकांना गोगलगायीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लागला असून, सह्याद्रीतील जैवविविधता आणखीन समृद्ध झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीवन्यजीव अभयारण्यामध्ये एका, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे एका गोगलगायींची नवीन प्रजात आढळली आहे. ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन आणि डॉ. अमृत भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सह्याद्रीतील गोगलगायी या प्रकल्पामधील हे संशोधन आहे.

या दोन्ही प्रजाती प्रदेशनिष्ठ प्रजाती असून, या संशोधनामध्ये कऱ्हाड आणि कोल्हापूर येथील संशोधकांचा सहभाग आहे. राधानगरी येथे आढळलेली गोगलगाय ही ११७ वर्षांनंतर पेरोटेटिया या पोटजातीतील एका प्रजातींपैकी असल्याचा उलगडा झाला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात आढळलेल्या नव्या प्रजातीचे वरदिया आंबोलिएन्सिस असे नामकरण झाले आहे. या दोन्ही नवीन प्रजाती असल्याबद्दल याच आठवड्यात शिक्कामोर्तब झाले आहे.

कऱ्हाड येथील सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील प्रभारी सहायक प्राध्यापक डॉ. अमृत भोसले, ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे प्रमुख आणि संशोधक तेजस ठाकरे आणि बेन रोव्हसन यांनी नव्या प्रजातीचा उलगडा केला आहे. या शोधाचे वृत्त बुधवारी आर्किव्ह फर मोलुस्केंकुंदे या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले.

डॉ. भोसले यांना ही प्रजात सर्वप्रथम २०१८ मध्ये सर्वेक्षणादरम्यान दिसली होती. २०१९ मध्ये ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे कोल्हापूरचे सदस्य स्वप्नील पवार, अक्षय खांडेकर आणि विनोद आडके यांनी भोसले यांना या प्रजातीचे नमुने जमा करण्यास मदत केली. या तिन्ही संशोधकांनी या नमुन्यांतील शंखाचा आकारशास्त्रीय अभ्यास आणि रिप्रॉडक्शन सिस्टमचे निरीक्षण केल्यानंतर ही प्रजात नवीन असल्याचे स्पष्ट झाले.

पेरोटेटियाचे वैशिष्ट्ये

देशात या पोटजातीमध्ये एकूण १४ प्रजाती सापडतात. दाजीपूरमध्ये आढळलेली ही प्रजात पेरोटेटिया या पोटजातीमधील असून, त्यामधील शेवटची प्रजात ही १९०३ मध्ये शोधण्यात आली आहे. आता जवळपास ११७ वर्षांनंतर या पोटजातीमधून एक प्रजात उलगडली आहे. राधानगरी अभयारण्याच्या दाजीपूर वनपरिक्षेत्रामधील उगवाई देवी मंदिर परिसरातील देवराईमध्ये आढळलेल्या या गोगलगायींच्या नवीन प्रजातीला पेरोटेटिया राजेशगोपाली असे नाव दिले आहे. २ सेंटीमीटरपेक्षा लहान आकाराची ही प्रजात मांसभक्षी असून, आजूबाजूला मिळणाऱ्या इतर गोगलगायींना ती फस्त करते. तिच्या शंखाचा रंग पांढरा, शरीराचा पिवळसर आणि स्पर्शकांचा रंग केशरी आहे. ही प्रजात प्रदेशनिष्ठ आहे. व्याघ्र संशोधनामध्ये उल्लेखनीय काम करणारे डॉ. राजेश गोपाळ यांचे नाव या प्रजातीला दिले

आंबोलीतील गोगलगायीला कोल्हापूरच्या संशोधकाचे नाव

कऱ्हाड येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयातील प्रभारी सहायक प्राध्यापक डॉ. अमृत भोसले यांच्यासह ह्यठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनह्णचे प्रमुख आणि संशोधक तेजस ठाकरे, दीपक मुळ्ये आणि ह्यएनएचएम लंडनह्णचे डॉ. दिनारझार्दे रहीम यांनी सिंधुदुर्गातील आंबोली परिसरातील शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळमधून शोधलेल्या गोगलगायींच्या नव्या प्रदेशनिष्ठ पोटजातीला कोल्हापूरच्या डॉ. वरद गिरी यांचे नाव दिले असून वरदिया असे या पोटजातीचे नाव आहे. या नव्या प्रजातीचे वरदिया आंबोलिएन्सिस असे नामकरण झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात शोधलेली ही २१ वी नवीन प्रजाती आहे. याची माहिती गेल्याच आठवड्यात युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनॉमी या संशोधन नियतकालिकामध्ये प्रकाशित झाली आहे. डॉ. भोसले यांना २०१७ मध्ये आंबोली येथे ही प्रजाती सर्वप्रथम आढळली. नंतर २०१९ आणि २०२० च्या पावसाळ्यातही आढळली होती. आंबोली धबधब्यानजीक झाडावर, पालापाचोळ्यामध्ये, दगडावर आणि हिरण्यकेशी मंदिराच्या भिंतींवर ही गोगलगाय आढळली. तिचा रंग करडा काळसर असून, ती ७ सेंटीमीटरपर्यंत वाढते.


गोगलगायींसारख्या छोट्या प्रजातींचे संशोधन करण्यासाठीचा हा योग्य काळ आहे. पश्चिम घाटामध्ये असलेल्या अनेक प्रजातींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे या प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे. गोगलगायींसारख्या सूक्ष्म प्रजातींचा, तर फारच कमी अभ्यास झाला आहे. डॉ. अमृत भोसले हे मागील काही वर्षांपासून नव्याने शोधलेल्या गोगलगायींच्या प्रजातींवर काम करत असून, या शोधाला हातभार लावल्याचा मला आनंद आहे.
-तेजस ठाकरे,
संशोधकप्रमुख, ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन

 

 

 

 

 

Web Title: Two new species of snails found in Sahyadri; Including Dajipur, Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.