ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 07:07 IST2025-05-04T07:07:32+5:302025-05-04T07:07:39+5:30
कोविडनंतर भारतात मनोरंजन क्षेत्रात २०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक

ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुढील २० वर्षांमध्ये काय घडेल ते आज सांगणे कठीण आहे; पण मनोरंजनाचा व्यवसाय वाढत आहे. स्टोरी टेलिंगपासून सारे काही बदलत आहे. मागच्या वर्षी भारतीयांनी ओटीटीवर ३० लाख तास विविध प्रकारचा कंटेंट पहिला. भारतात खूप सुंदर सिनेमा संस्कृती आहे. लोक एकरूप होऊन सिनेमा बघतात, असे नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस यांनी सांगितले.
कोविडनंतर भारतात मनोरंजन क्षेत्रात २०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली, असेही सारंडोस यांनी ‘नवीन भारताचे प्रवाहीकरण : संस्कृती, कनेक्टिव्हिटी आणि सर्जनशील गुंतवणूक’ या चर्चासत्रात सांगितले. अभिनेता सैफ अली खान यांनी त्यांना बोलते केले. रामायण, महाभारत, पंचतंत्र, लोककथांवर आधारलेले कंटेंट जगभरातील रसिकांच्या मनात घर करू शकतात, असा विश्वास अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केला. ‘ओंकारा’ आणि ‘परिणीता’ या सिनेमांची उदाहरणे सैफ अली खान यांनी दिली.
मनोरंजनाच्या सीमारेषा आज धूसर झाल्या आहेत. करमणुकीची साधने बदलली आहेत. बालपणीच्या एक पडदा सिनेमागृहात सिनेमा पाहण्याच्या दिवसांची त्याने आठवण करून दिली. लेखन खूप टोकदार असायला हवे. कॅरेक्टर चांगल्या प्रकारे लिहिली गेली तर ती चांगली परफॉर्म करता येतात. आंतरराष्ट्रीय पद्धतीने गोष्ट सांगणे हा विचारच खूप उत्साहित करणारा आहे. महाभारतसारखे महाकाव्य कालातीत आहे, असेही सैफ अली खान यांनी सांगितले.
ओटीटीचा बोलबाला?
किती जण नेटफ्लिक्स बघतात, यावर टेड यांनी उपस्थितांना हात वर करायला सांगितले. सभागृहातील ९० टक्के लोकांचे हात वर होते.
यावरून आज ओटीटीला किती महत्त्व प्राप्त झाले आहे याची झलक पाहायला मिळते, असे त्यांनी सांगितले. कथाकथनाद्वारे प्रेक्षकांशी जोडण्याचा हेतू कायम आहे.