UPSC परीक्षेत अपयशी ठरलेल्या उमेदवारांनाही मिळणार नोकरी; आयोगाची नवीन योजना? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:27 IST2025-06-20T17:27:40+5:302025-06-20T17:27:49+5:30
UPSC Pratibha Setu: लाखो उमेदवार दरवर्षी UPSC परीक्षा देतात, परंतु मोजकेच यशस्वी होतात.

UPSC परीक्षेत अपयशी ठरलेल्या उमेदवारांनाही मिळणार नोकरी; आयोगाची नवीन योजना? जाणून घ्या...
UPSC Pratibha Setu: IAS किंवा IPS बनण्याचे स्वप्न पाहणारे लाखो उमेदवार दरवर्षी UPSC परीक्षा देतात, परंतु लाखोंपैकी मोजकेच उमेदवार यशस्वी होतात. अपयश पदरात पडूनही काहीजण पुन्हा जोमाने तयारीला लागतात, पण ज्यांचे वय संपले, त्यांच्यासाठी पुढची वाट खूप खडतर असते. एकतर ते कुठेतरी खासगी नोकरी करतात, किंवा व्यवसायाची वाट धरतात. दरम्यान, अशा उमेदवारांसाठी आता यूपीएससीने रोजगाराचा मार्ग सोपा केला आहे.
यूपीएससीने एक योजना आणली आहे, ज्याद्वारे मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणारे, परंतु उत्तीर्ण न होऊ शकलेल्या उमेदवारांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.यूपीएससीने 'प्रतिभा सेतू' नावाची योजना सुरू केली आहे. याद्वारे खाजगी आणि सरकारी संस्था त्या उमेदवारांशी थेट संपर्क साधू शकतील आणि त्यांच्या प्रतिभेचा योग्य वापर करू शकतील. म्हणजेच काय, तर त्यांना नोकरीच्या संधी दिल्या जातील.
दरम्यान, यूपीएससीची ही योजना नवीन नाही. पूर्वीदेखील यूपीएससी चांगल्या उमेदवारांची माहिती कंपन्यांना किंवा जिथे नोकऱ्या मिळू शकतात, तिथे पाठवत असे. आता उमेदवारांची सर्व माहिती प्रतिभा सेतू वेबसाइटवर उपलब्ध असेल. मंत्रालये, स्वायत्त विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी कंपन्या प्रतिभा सेतू पोर्टलवर उमेदवारांची माहिती मिळवू शकतील. यासाठी कंपनीला प्रथम नोंदणी करावी लागेल आणि कॉर्पोरेट ओळख क्रमांक (CIN) घ्यावा लागेल. प्रतिभा सेतूमध्ये अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
प्रतिभा सेतूवर उमेदवारांची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कंपन्यांना काय करावे लागेल?
Step 1: प्रतिभा सेतूवर जाण्यासाठी प्रथम गुगलवर upsconline.gov.in सर्च करा.
Step 2: तुम्ही त्यात सर्व तपशील वाचू शकता.
Step 3: यानंतर, लॉग-इन वर क्लिक करा.
Step 4: आता तुम्हाला नोंदणी पर्याय दिसेल.
Step 5: यामध्ये कंपनीला खाजगी संघटना पर्याय निवडावा लागेल.
Step 6: यानंतर सर्वप्रथम CIN क्रमांक जनरेट करावा लागेल, जो MCA पोर्टलद्वारे केला जाईल.
Step 7: यासाठी कंपनीचा आयडी MCA पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
Step 8: CIN क्रमांक जनरेट केल्यानंतर, तुम्हाला UPSC प्रतिभा सेतू वेबसाइटवर जाऊन CIN क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
Step 9: सबमिट केल्यानंतर, कंपन्यांना पोर्टलवर उमेदवारांची माहिती देखील मिळेल.
या योजनेअंतर्गत, उमेदवारांचा बायोडेटा, ज्यामध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता आणि संपर्क तपशील समाविष्ट आहेत. UPSC ने म्हटले आहे की, अशा 10,000 हून अधिक उमेदवारांचा डेटा प्रतिभा सेतूवर उपलब्ध करून दिला जाईल.
या परीक्षांच्या उमेदवारांची माहिती उपलब्ध असेल
यूपीएससीने म्हटले आहे की, नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, अभियांत्रिकी सेवा, संयुक्त भूगर्भशास्त्रज्ञ, संयुक्त संरक्षण सेवा, भारतीय आर्थिक सेवा / भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा आणि संयुक्त वैद्यकीय सेवेत अपयशी ठरलेल्या उमेदवारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.