वैद्यकीय शिक्षणात वाढतोय मुलींचा टक्का! २०१९-२० नंतर मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण पुन्हा वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 08:07 IST2025-12-15T08:06:34+5:302025-12-15T08:07:04+5:30
यंदा सीईटी सेलने राज्य कोट्यातील जागांसाठी घेतलेल्या प्रवेशप्रक्रियेत तब्बल ४,०४० विद्यार्थिनींनी प्रवेश घेतले आहेत.

वैद्यकीय शिक्षणात वाढतोय मुलींचा टक्का! २०१९-२० नंतर मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण पुन्हा वाढले
अमर शैला
प्रतिनिधी
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षीच तीव्र स्पर्धा असते. राष्ट्रीय पातळीवरील 'नीट' पात्रता परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी बसतात. त्यातून निवड होऊन महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्रता यादीत स्थान मिळणे तसे अवघडच असते. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मुलींनी त्यांचे स्थान भक्कम केल्याचे दहा वर्षातील आकडेवारी तपासली असता दिसून येते. यंदा सीईटी सेलने राज्य कोट्यातील जागांसाठी घेतलेल्या प्रवेशप्रक्रियेत तब्बल ४,०४० विद्यार्थिनींनी प्रवेश घेतले आहेत.
वैद्यकीय शिक्षणात गेल्या दशकात झालेला बदल हा समाज व आरोग्यक्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. राज्यात दहा वर्षांपूर्वी एमबीबीएसच्या केवळ ३,३४७ जागा होत्या. गेल्या दहा वर्षात सरकारी आणि खासगी अशी दोन्ही वैद्यकीय महाविद्यालये राज्यात वाढली आहेत. सध्या राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमाची सरकारी आणि अनुदानित अशी ४२ महाविद्यालये आहेत, तर खासगी विनाअनुदानित वैहाकीय महाविद्यालयांची संख्या २५ झाली आहे. त्यातून एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागाही मोठ्या प्रमाणात वाढल्या.
यंदा एमबीबीएसच्या ८,५३५ जागा आहेत. एमबीबीएस प्रवेशासाठी चढाओढ असताना मुलींनीही बाजी मारली आहे. राज्यात २०१५-२०१६ आणि २०१६-१७ या वर्षात एमबीबीएसला ५१ टक्क्यांहून अधिक मुलींनी प्रवेश घेतले होते. त्यानंतर मुलींचा टक्का घसरू लागला होता. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात तर हे प्रमाण ४१ टक्क्यांपर्यंत घसरले होते. मात्र त्यानंतर पुन्हा मुलींचे प्रमाण वाढू लागले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ४७.३ टक्के मुलींनी प्रवेश घेतला आहे.

शुल्कमाफीही पथ्यावर
राज्य सरकारने मुलींसाठी शैक्षणिक शुल्क पूर्ण माफ केले आहे. त्याचा परिणाम खासगी महाविद्यालयांत मुलींच्या प्रवेशात वाढ होण्यात झाला आहे. सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या अनेक विद्यार्थिनी खासगीमध्ये प्रवेश घेत आहेत.
यंदा खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी ३,५९९ जागा होत्या. त्यापैकी १,६९९ जागांवर मुलांनी प्रवेश घेतले, तर १,९०० जागांवर मुर्लीचे प्रवेश झाले आहेत. खासगी महाविद्यालयांतील शैक्षणिक सवलतीचा लाभ मुली मोठ्या प्रमाणावर घेताना दिसत आहेत.