शिक्षक अभियोग्यता चाचणी निकाल जाहीर; १०,७७८ उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध, ६,३२० निकाल राखीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:09 IST2025-08-19T14:07:35+5:302025-08-19T14:09:43+5:30
२७ मे ते ३० मे आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती परीक्षा

शिक्षक अभियोग्यता चाचणी निकाल जाहीर; १०,७७८ उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध, ६,३२० निकाल राखीव
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत १०,७७८ उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध केला असून ६,३२० उमेदवारांचा निकाल उचित कारणास्तव राखीव ठेवल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. ज्या उमेदवारांनी मुदतीत कागदपत्रे जमा केली, त्यांपैकी काही उमेदवारांना त्यांचा निकाल दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
बी.एड. परीक्षेसाठी १५,७५६ व डी.एल. एड. परीक्षेसाठी १,३४२ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी १४ ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत बी.एड. परीक्षेचे ९,९५१ व डी.एल.एड. परीक्षेचे ८२७ असे मिळून एकूण १०,७७८ उमेदवारांचा निकाल जाहीर केला आहे. मात्र, परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एका महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र परीक्षा परिषद कार्यालयात सादर न केलेल्या उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये बी.एड. परीक्षेचे ५,८०५ व डी.एल.एड. परीक्षेचे ५१५, असे मिळून ६,३२० उमेदवारांचा निकाल थांबविण्यात आला आहे. या संदर्भात ही परीक्षा २७ मे ते ३० मे २०२५ व २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ६० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.
४ जुलै रोजी झारी झालेल्या बीएड उत्तीर्ण निकालाची वैध कागदपत्रे परीक्षा परिषदेच्या कार्यालयात १४ जुलै २०२५ रोजी जमा केली होती. तरीही १८ ऑगस्टला अभियोग्यता चाचणी परीक्षा निकालात माझा निकाल मात्र जाहीर झालेला नाही. यामुळे खंत वाटते.
-इशरत अश्फाक तांबोळी, उमेदवार