मानलं भावा! रेल्वे अपघातात दोन्ही पाय अन् एक हात गमावला; पठ्ठ्याने अशी क्रॅक केली UPSC...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 22:03 IST2024-04-24T22:02:51+5:302024-04-24T22:03:51+5:30
UPSC Success Story : अपघातात शरीराचे तुकडे पडले, पण त्याने आयुष्यात कधीही हार न मानण्याचा निश्चय केला.

मानलं भावा! रेल्वे अपघातात दोन्ही पाय अन् एक हात गमावला; पठ्ठ्याने अशी क्रॅक केली UPSC...
Suraj Tiwari UPSC Success Story: असे म्हणतात की, कठोर मेहनत घेणारा कधीच अपयशी होत नाही. तुम्ही कुठल्याही परिस्थिती असाल, पण जर तुमच्यात कठोर परिश्रम करुन ध्येय गाठण्याची जिद्द असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाबद्दल सांगणार आहोत, अतिशय कठीण परिस्थितीत सर्वात अवघड अशी UPSC परीक्षा पास केली.
रेल्वे अपघातात शरीराचे तुकडे पडले...
उत्तर प्रदेशातील मैनपुरीचा रहिवासी सूरज तिवारीसोबत अशी घटना घडली, ज्याचा कुणी विचारदेखील करू शकत नाही. 2017 मध्ये रेल्वे अपघातात सूरजला त्याचे दोन्ही पाय, एक हात आणि दुसऱ्या हाताची दोन बोटे गमवावी लागली. मात्र असे असूनही त्याने जीवनात हार न मानण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या भीषण अपघातातून बचावल्यानंतर सूरजने देशातील सर्वात कठीण UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली आणि 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत देशभरात 917 वा क्रमांक मिळवून IAS झाला.
त्याची फक्त तीन बोटे पुरेशी आहेत...
सूरजच्या यूपीएससीतील यशाबद्दल आनंद व्यक्त करताना त्याचे वडील रमेश तिवारी म्हणाले की, आम्हाला सूरजचा खुप अभिमान आहे. यशास्वी होण्यासाठी त्याची तीन बोटंच पुरेशी आहेत. तर, सूरजची आई म्हणते, तो अभ्यासात खुप हुशार आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. तो नेहमी आपल्या लहान भावंडांना कठोर परिश्रम घेण्यास प्रेरित करतो.