विद्यार्थ्यांनो शिका ‘एम.टेक इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’; रोबोटिक्स आणि ऑटोमेशन केंद्राचे आज उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 05:39 IST2025-07-10T05:38:58+5:302025-07-10T05:39:33+5:30
विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथील विस्तीर्ण केंद्रातील सुमारे ४५ हजार चौरस फुटांवर हे सेंटर तयार करण्यात आले आहे. हे केंद्र रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि औद्योगिक ऑटोमेशनमधील संशोधन, विकास आणि प्रशिक्षणासाठी केंद्र म्हणून काम करणार आहे.

विद्यार्थ्यांनो शिका ‘एम.टेक इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’; रोबोटिक्स आणि ऑटोमेशन केंद्राचे आज उद्घाटन
मुंबई : उद्योन्मुख आणि प्रगत क्षेत्रासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी मुंबई विद्यापीठात यंदापासून ‘एम.टेक इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ दोन वर्षांच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमाचीही सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथे अद्ययावत असे ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ (रोबोटिक्स आणि ऑटोमेशन उत्कृष्टता केंद्र) केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन गुरुवारी केले जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथे आयोजित होत असलेल्या या उद्घाटन समारंभास डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत हे प्रमुख पाहुणे असतील. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू
प्राचार्य डॉ. अजय भामरे उपस्थित राहणार आहेत.
रोबोटिक्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्या सहकार्याने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात रोबोटिक्स सिस्टिम, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत ॲप्लिकेशन्स, विद्यार्थी आणि संशोधकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रकल्पांवर काम करण्याच्या अनेक संधींचे दालन येथे खुले होणार आहे.
मेडिटेशन सेंटरचेही उद्घाटन
स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथे पीएम-उषा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटनही गुरुवारी होणार आहे. अद्ययावत सोयीसुविधांनीयुक्त या केंद्रात मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागामार्फत या शैक्षणिक वर्षापासून ‘डिप्लोमा इन परियत्ती अँड परिपत्ती इन पाली लिटरेचर’ आणि ‘डिप्लोमा इन विपश्यना भावना एज सीन इन पाली लिटरेचर’ हे एक वर्षाचे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत.