Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 06:56 IST2025-06-15T06:54:20+5:302025-06-15T06:56:06+5:30
Foreign Universities In Navi Mumbai: नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये पाच परदेशी विद्यापीठांसाठी आशयपत्र प्रदान करण्यात आली.

Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
मुंबई : नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये पाच परदेशी विद्यापीठांसाठी आशयपत्र प्रदान करण्यात आली. मुंबईला ग्लोबल एज्युहब बनविण्याचे स्वप्न आज सुरू होत असून, येत्या काळात आणखी पाच परदेशी विद्यापीठे येतील. त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ अंतर्गत हा कार्यक्रम शनिवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी, अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी, अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हँकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा उपस्थित होते. या परदेशी विद्यापीठांना नवी मुंबईत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचेही त्यांनीच सूत्रसंचालन केले.
नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच एज्युसिटी २५० एकर क्षेत्रात साकारली जात आहे. एज्युसिटी येथे आगामी कालावधीत १० विद्यापीठे एकत्र येतील, अशी संकल्पना असल्याचे फडणवीस म्हणाले. आता परदेशी विद्यापीठे भारतात येत असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज नाही. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी तिथे जाऊ शकत नाहीत. मात्र, आता त्यांना परदेशी विद्यापीठांच्या भारतातील कॅम्पसमध्ये शिकता येईल. जागतिक दर्जाचे हे शिक्षण विद्यार्थ्यांना २५ ते ३३ टक्के खर्चात मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
हरयाणा, बंगळुरूसह मुंबईत नऊ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होतील. आणखी सहा विद्यापीठांचे प्रस्ताव चर्चेत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाचा फायदा देशाला मिळेल. आपल्या शिक्षण संस्थांना परदेशामध्ये शाखा उघडता येतील. आयआयटी मद्रास, दिल्ली, आयआयएम अहमदाबाद आदींचे कॅम्पस परदेशात सुरू केले आहेत.
धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री
या विद्यापीठांना इरादापत्र
युनिव्हर्सिटी ऑफ ॲबरडीन युकेचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्रा. सिलादित्य भट्टाचार्य, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या उपकुलगुरू गॉय लिटलफेअर, यॉर्क विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज ईचंबाडी व इस्टिटुटो युरोपियो डी डिझाइनचे रिकार्डो बाल्बो यांना इरादापत्रे दिली.