शिक्षकांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र देशात आघाडीवर; प्रशिक्षित शिक्षकांत महिलांची संख्या अधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:04 IST2025-09-05T10:04:29+5:302025-09-05T10:04:58+5:30
महाराष्ट्रात प्रशिक्षित शिक्षकांची संख्याही वाढल्याचा फायदाही विद्यार्थ्यांना होताना दिसत असल्याचे यूडायस अहवालातून समोर आले आहे

शिक्षकांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र देशात आघाडीवर; प्रशिक्षित शिक्षकांत महिलांची संख्या अधिक
मुंबई - गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होताना दिसत आहे. राज्यात शाळांची संख्या किंचित कमी झाली असली तरी शिक्षकांची संख्या पाच हजारांनी वाढली आहे. त्यामुळे एका शिक्षकावर अनेक विद्यार्थ्यांचा येत असलेला भार कमी झाला आहे.
महाराष्ट्रात प्रशिक्षित शिक्षकांची संख्याही वाढल्याचा फायदाही विद्यार्थ्यांना होताना दिसत असल्याचे यूडायस अहवालातून समोर आले आहे. वीज, पाणी, शौचालय यांसारख्या मूलभूत सोयी बहुतेक शाळांत उपलब्ध असल्या, तरी संगणक-इंटरनेटची कमतरता आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी गळती ही अजूनही चिंतेची बाब आहे.
प्राथमिक स्तरावरही स्त्रीशक्तीचाच भरणा...
महाराष्ट्रात महिला शिक्षकांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. २०२२-२३ मध्ये पुरुष शिक्षकांचे प्रमाण ५० टक्के तर महिला शिक्षकांचे प्रमाण ४९ टक्के होते.
२०२३-२४ मध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण ५०.५ टक्क्यावर तर २०२४-२५ मध्ये हे प्रमाण ५१ टक्क्यांवर गेले आहे. प्राथमिक स्तरावर महिला शिक्षकांची संख्या अधिक असून, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर पुरुष शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे.
संपूर्ण देशात गुणवत्तेतदेखील महाराष्ट्रच अग्रेसर...
शिक्षकांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यातील ९५ ते ९७ टक्के शिक्षक प्रशिक्षित असून बहुतेकांकडे व्यावसायिक पात्रता आहे. विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टाशी जवळपास मिळते-जुळते आहे. २०२४-२५ मध्ये संगणक आणि इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर शक्य झाला आहे.