राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय! प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:18 IST2025-07-24T16:18:10+5:302025-07-24T16:18:40+5:30

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठकीत निर्णय

Decision to establish 'Student Assistance Center' in the state! Important step for admission guidance | राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय! प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय! प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तसेच तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर हे मान्यवर उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी संगणक सुविधांसह सुसज्ज अशी 'विद्यार्थी सहाय्यता केंद्रे' स्थापन करण्यात येत आहेत. ही केंद्रे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची तपासणी, समुपदेशन आणि मार्गदर्शन याबाबत मदत करतील. प्रत्येक जिल्ह्यातील दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही 'विद्यार्थी सहाय्यता केंद्रे' कार्यान्वित केली जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक सहाय्यता देणे, तसेच विविध शंका निरसन करणे ही केंद्रांची प्रमुख भूमिका असेल.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू होणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मदत होईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Decision to establish 'Student Assistance Center' in the state! Important step for admission guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.