इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या फेरीत ९८ हजार जणांना कॉलेज वाटप; महाविद्यालयात जाऊन घ्यायचाय प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 10:36 IST2025-08-22T10:35:47+5:302025-08-22T10:36:25+5:30
थेट संस्थात्मक स्तरावर चौथ्या फेरीनंतरच प्रवेश घ्यावा लागेल

इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या फेरीत ९८ हजार जणांना कॉलेज वाटप; महाविद्यालयात जाऊन घ्यायचाय प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या कॅप फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली असून, या फेरीत ९८ हजार ०५५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतील जागांचे वाटप केले आहे. या फेरीमध्ये पहिल्या सहा पसंतीची महाविद्यालये मिळालेल्या ९,७०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज गोठविले आहेत. त्यामुळे त्यांना या फेरीत देण्यात आलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागणार आहे. अन्यथा हे विद्यार्थी कॅप फेरीतून बाहेर जाणार असून, त्यांना थेट संस्थात्मक स्तरावर चौथ्या फेरीनंतरच प्रवेश घ्यावा लागेल.
यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २ लाख १४ हजार एवढ्या विक्रमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर प्रवेशासाठी १,८३,७६० जागा उपलब्ध आहेत. प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी १,१९,०२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पर्याय निवडून अर्ज भरले होते. त्यातील ९८,०५५ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांच्या जागांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, प्रवेशाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये मिळून ६४,८४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
असे आहे फेरीचे वेळापत्रक
- विद्यार्थ्यांना २२ ऑगस्ट ते २५ ऑगस्टदरम्यान दुसऱ्या फेरीत वाटप झालेल्या कॉलेजात प्रवेश घ्यावा लागेल.
- तिसऱ्या फेरीसाठी २६ ऑगस्टला रिक्त जागा जाहीर होणार
- चौथ्या फेरीसाठी २८ ऑगस्ट ते ३० ऑगस्टदरम्यान अर्ज करता येणार चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी १ सप्टेंबरला जाहीर होणार