आता होतोय खरा उपयोग विद्यापीठांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:40 IST2026-01-18T12:40:08+5:302026-01-18T12:40:46+5:30

हार्वर्ड विद्यापीठाने नेतृत्वविकास, सार्वजनिक धोरण, माध्यमांची स्वायत्तता आणि सामाजिक संवाद यांवर भर दिला आहे

Beyond Rankings How Global Universities are Solving Real World Problems | आता होतोय खरा उपयोग विद्यापीठांचा

आता होतोय खरा उपयोग विद्यापीठांचा

डॉ. राजन वेळूकर 

माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

एमआयटी, हार्वर्ड, ऑक्सफर्ड, स्टॅनफर्ड आणि केंब्रिज यांसारखी नामांकित विद्यापीठे आता केवळ रॅकिंग्स किंवा शैक्षणिक प्रतिष्ठेपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू थेट समाजाला भेडसावणाऱ्या वास्तव समस्यांकडे वळताना दिसून येत आहे. उदाहरणार्थ, एमआयटीमध्ये ऊर्जासंक्रमण, हवामान बदल आणि आरोग्य तंत्रज्ञान यांवर आंतरशाखीय संशोधन केले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने कर्करोगाचे लवकर निदान करणारे सेन्सर्स, तसेच स्वच्छ ऊर्जेसाठी उद्योगांबरोबर केलेली भागीदारी, हे उपक्रम प्रयोगशाळेतच थांबत नाहीत, तर समाजाच्या गरजांशी थेट जोडलेले आहेत.

हार्वर्ड विद्यापीठाने नेतृत्वविकास, सार्वजनिक धोरण, माध्यमांची स्वायत्तता आणि सामाजिक संवाद यांवर भर दिला आहे. यामागील भूमिका स्पष्ट आहे. समाजातील समस्या केवळ तांत्रिक नसून त्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयही असतात. त्यामुळे विविध क्षेत्रांतील विद्यार्थी, संशोधक, धोरणकर्ते आणि नेते यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न येथे होताना आपल्याला दिसून येतो

ऑक्सफर्ड आणि केंब्रिजसारखी परंपरागत विद्यापीठेही आज बहुविषयक अभ्यास, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामाजिक परिणाम यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. स्टॅनफर्ड विद्यापीठाने संशोधन, उद्योग आणि स्टार्टअप्स यांचा मजबूत पूल उभारून नवकल्पनांना चालना दिली आहे. त्यामुळे ते संशोधन थेट उद्योग व समाजाच्या उपयोगी पडते.

या सर्व उदाहरणांमधून एक महत्त्वाचा संदेश स्पष्ट होतो. कोणतेही विद्यापीठ एकट्याने जागतिक समस्या सोडवू शकत नाही. उद्योग, सरकार, सामाजिक संस्था आणि स्थानिक समुदाय यांच्याशी भागीदारी केल्याशिवाय टिकाऊ आणि प्रभावी उपाय शक्य नाहीत, हे जागतिक विद्यापीठांनी ओळखले आहे.

आजचे जग कधी नव्हे अशा वेगाने बदलत आहे. हवामान बदल, ऊर्जाटंचाई, आरोग्यविषयक संकटे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा समाजावर होणारा परिणाम, तसेच वाढती आर्थिक व सामाजिक विषमता या सर्व यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बघितल्या नसलेल्या समस्या आज मानवजातीसमोर उभ्या ठाकल्या आहेत. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत केवळ पुस्तकी ज्ञान निर्माण करणे पुरेसे नाही, हे त्यांनी चांगलेच ओळखलेले दिसून येते. त्यामुळेच जगातील आघाडीच्या विद्यापीठांनी आपली भूमिका बदलली आणि ती नव्याने विचार करताना दिसत आहेत.

आज जागतिक पातळीवर विद्यापीठांचे बदल हे 'केवळ रैंकिंग्स नव्हे, तर सामाजिक व पर्यावरणीय परिणाम, कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित शिक्षण आणि वास्तव जगाशी संगती' या दिशेने होत आहेत. भारतातील काही निवडक शिक्षण संस्था या मार्गावर प्रयत्नशील आहेत; मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन, सहकार्य आणि गुणवत्तेतील तेजस्विता वाढवण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

म्हणूनच आज काळ ज्ञानाची मंदिरे न राहता, समाजपरिवर्तनाची प्रभावी केंद्रे बनण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. संशोधन, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधून या सर्व विद्यापीठांनी जगाच्या भविष्यासाठी नवे मार्ग शोधून अधिक प्रयत्न करून जबाबदारी स्वीकारावी, ही अपेक्षा आहे.

Web Title : विश्वविद्यालय अब सही मायने में उपयोगी: सामाजिक प्रभाव और नवाचार पर ध्यान केंद्रित।

Web Summary : वैश्विक विश्वविद्यालय रैंकिंग से ऊपर सामाजिक प्रभाव को प्राथमिकता देते हैं, जलवायु परिवर्तन, स्वास्थ्य सेवा और असमानता से निपटते हैं। प्रभावी समाधान और उज्जवल भविष्य के लिए शिक्षा, उद्योग और सरकार के बीच सहयोग महत्वपूर्ण है। भारतीय संस्थानों को उत्कृष्टता के लिए प्रयास करना चाहिए।

Web Title : Universities Now Truly Beneficial: Focusing on Societal Impact and Innovation.

Web Summary : Global universities prioritize societal impact over rankings, tackling climate change, healthcare, and inequality. Collaboration between academia, industry, and government is crucial for effective solutions and a brighter future. Indian institutions must strive for excellence.