बी. फार्मसीच्या पहिल्या फेरीत २९,१६६ विद्यार्थ्यांना प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 07:23 IST2025-10-06T07:23:05+5:302025-10-06T07:23:16+5:30
गेल्यावर्षी फार्मसी कॉलेजांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रवेशांसाठी डिसेंबर महिना उजाडला होता.

बी. फार्मसीच्या पहिल्या फेरीत २९,१६६ विद्यार्थ्यांना प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बी. फार्मसी, फार्म डी. अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीची पहिली गुणवत्ता यादी अखेर जाहीर झाली असून, पहिल्या फेरीत यंदा २९,१६६ विद्यार्थ्यांना कॉलेजांतील जागांचे वाटप करण्यात आले. तर, तब्बल १३,८९५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज मिळाले असून, त्यांचे अर्ज फ्रीज करण्यात आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये अर्ज करता येणार नाहीत.
गेल्यावर्षी फार्मसी कॉलेजांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रवेशांसाठी डिसेंबर महिना उजाडला होता. राज्यात बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला यंदाही मोठा विलंब झाला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सप्टेंबर अखेरीस प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे कॉलेज सुरू होण्यासाठी यंदाही नोव्हेंबर उजाडणार आहे. आता सीईटी सेलने पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
यंदा राज्यात बी. फार्मसीच्या ४४,२८७ जागा आहेत. त्यासाठी ५५,११६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील पहिल्या कॅप फेरीसाठी ३८,४६२ विद्यार्थ्यांनी कॉलेजांचे पर्याय निवडून अर्ज सादर केले होते. यातील २९,१६६ विद्यार्थ्यांना कॉलेजांतील जागांचे वाटप करण्यात आले आहे. तर १५,१२१ विद्यार्थ्यांना कोणतेही कॉलेज मिळाले नाही, अशी माहिती सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यंदा पहिल्या फेरीच्या जागा घटल्या
काेरोनानंतर राज्यात फार्मसी कॉलेजांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या जागा गेल्यावर्षी ४८ हजार ५१ पर्यंत पोहचल्या होत्या. तर गेल्यावर्षी या अभ्यासक्रमाला ३१,८२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. दरम्यान यंदा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) शिफारसीनंतर राज्यातील बी. फार्मसीच्या १८ कॉलेजांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या कॉलेजांमध्ये यंदा प्रथम वर्षाचे प्रवेश दिले जाणार नाहीत. त्यातून या कॉलेजांच्या जागा कमी झाल्या आहेत. तसेच, अद्यापही फार्मसी कॉलेजांची मान्यता प्रक्रिया
सुरूच आहे.