‘स्टार’ आहात ना,  फुका मरता कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:15 AM2021-03-02T06:15:03+5:302021-03-02T06:17:35+5:30

सोशल मीडियाने रातोरात दिलेली प्रसिद्धी टिकवून ठेवण्यासाठी खेळावा लागणारा  “लाइक्स”च्या आकड्यांचा खेळ हा एक नवाच जीवघेणाा फास तयार झाला आहे.

You are a 'star', why are you dying? | ‘स्टार’ आहात ना,  फुका मरता कशाला?

‘स्टार’ आहात ना,  फुका मरता कशाला?

Next

- नंदकिशोर पाटील, कार्यकारी संपादक, लोकमत


समीर गायकवाड, पूजा चव्हाण, रफी शेख, सिया कक्कर ही नावे अनेकांच्या चांगल्याच परिचयाची आहेत. विशेषत: जे सोशल मीडिया नावाच्या आभासी दुनियेत वावरत असतात, त्यांच्यापैकी अनेकांसाठी तर ही मंडळी ‘आयकाॅन’ असू शकतील. वर उल्लेख केलेल्या नावांच्या व्यक्ती नाव, गाव, स्थलपरत्वे भिन्न असतील; पण त्यांच्यात एक साधर्म्य आहे, ते म्हणजे, हे सगळे जण टिक-टाॅक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरचे स्टार आहेत आणि या सर्वांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा अकाली संपविली आहे. नाचगाणे, अथवा काॅमेडीचा एखादा व्हिडिओ पोस्ट करून ही मंडळी रातोरात स्टार बनली होती. पुढे तो त्यांचा दिनक्रम बनला आणि त्यातून त्यांना लाखो चाहतेही (फाॅलोअर्स) मिळाले. लाइक्स, शेअर अन्‌ कमेंटची अक्षरश: झिंग चढलेले आभासी दुनियेतील हे तथाकथित स्टार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलतात, हा  चिंतनाचा आणि सामाजिक चिंतेचा विषय आहे. एखाद्याच्या आत्महत्येमागे कौटुंबिक, आर्थिक वा इतर काही वैयक्तिक कारणे असू शकतात, पण सोशल मीडियाने रातोरात दिलेली प्रसिद्धी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी खेळावा लागणारा “लाइक्स”च्या  आकड्यांचा खेळ हा एक नवाच जीवघेणा फास  तयार झाला आहे. मिळालेली प्रसिद्धी हाताळू न शकलेले अनेक तरुण चेहेरे अचानक गायब तरी होतात, विस्म्रृतीत जातात. ज्यांना हे असे विसरले जाणे, विसरले जाण्याची शक्यताही सहन करता येत नाही, ते स्वत:लाच संपविण्याचा मार्ग पत्करतात  असे दिसते.  


तारुण्यात आयुष्याचा अकाली अंत करून घेण्यापूर्वी त्यांनी घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला घेतला असता तर कदाचित त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले नसते; पण आजकाल त्यांना विचारते कोण? घरच्यांपेक्षा मित्र-मैत्रिणी, फेसबुक फ्रेंड‌स्‌ जवळचे वाटू लागले आहेत. फेसबुकवरच्या न्यूज फिडवर सतत व्यक्त होणारी ही पिढी इतरांचे काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसते. व्हर्च्युअल आणि खऱ्या आयुष्याची गल्लत झाल्याने ऑनलाइनवर जे दिसते तेच खरे मानून त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणारी तरुणाई भावनिक हिंदोळ्यात अडकली, की पुरती गोंधळून जाते. सोशल मीडियात मिळणाऱ्या लाइक्समुळे त्यांच्यात एक प्रकारचा सुपरिऑरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो. स्वत:ला ते आयकॉन, मॉडेल समजू लागतात. त्यामुळे विरोधातली एखादी कमेंटही त्यांना अस्वस्थ करून जाते. आपला स्टारडम कमी होईल की काय, अशा अनामिक भीतीच्या सावटात ते सतत वावरत असतात. नार्सिस्ट होतात म्हणजे स्वतःच्याच प्रेमात असतात. हल्ली हा रोग तर समाजातील अनेकांना जडलेला आहे.


सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण जगभर वाढू लागले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार जगभरात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते आणि त्यात तरुणांचे प्रमाण ६० टक्के इतके आहे. मानसिक तणाव हे आत्महत्यांमागचे प्रमुख कारण  आहे. व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्यांना सतत भावनिक चढ-उताराचा सामना करावा लागतो. इथल्या स्पर्धेत आपण अव्वल राहू की नाही, या भीतीपोटी ते अधिकाधिक वेळ ऑनलाइन असतात. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हे रातोरात स्टार बनलेले नाहीत. त्यांच्या स्टारडममागे अपार मेहनत आहे. त्यांच्याही आयुष्यात मान-अपमानाचे प्रसंग आले, त्यांनाही यशाने अनेकदा हुलकावणी दिली; पण म्हणून ते खचले नाहीत. स्टारडमसुद्धा तितक्याच निगुतीने जपावे लागते. त्यासाठी प्रयत्नांचे सातत्य लागते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मुलांना हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. वयात आलेल्या मुलांच्या वर्तनात अचानक झालेला बदल हा सोशल मीडियाचा परिणाम असू शकतो आणि तो वेळीच हेरता आला नाही, तर पुढे आक्रित घडू शकते. 


हल्ली अनेकांना फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटरवर व्यक्त होण्याची इतकी सवय जडली आहे, की पोस्ट टाकली नाही, तर कदाचित आपण जगाच्या मागे राहू, अशी भीती त्यांना वाटते. त्यातूनच ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पोस्टवर पोस्ट टाकत असतात. या व्हर्च्युअल जगाने खऱ्या आयुष्यावर मात केली, की अवतीभवतीचे जगही खोटे वाटू लागते, मग खऱ्या आयुष्यात निर्माण झालेल्या समस्येचा सामना करताना ते नैराश्येच्या गर्तेत ओढले जातात. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.

Web Title: You are a 'star', why are you dying?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.