सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा पाळणा हलणार का?
By गजानन दिवाण | Updated: November 11, 2025 10:06 IST2025-11-11T10:05:53+5:302025-11-11T10:06:13+5:30
Tiger: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा संसार फुलावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तीन वाघ तेथे आहेतच. त्यांच्या सोबतीला दोन वाघिणींना सोडून त्याची सुरुवात होईल.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा पाळणा हलणार का?
- गजानन दिवाण
(सहायक संपादक, लोकमत, छ.संभाजीनगर)
साताऱ्याच्या घाटमाथ्यावर, सावंतवाडीच्या दऱ्यांमध्ये आणि कोकणाच्या डोंगरमाथ्यांत पसरलेल्या घनदाट अरण्याच्या कुशीत महाराष्ट्राने आपला तिसरा व्याघ्र प्रकल्प म्हणून सह्याद्रीची निवड केली. या प्रकल्पाची कहाणी सुरुवातीपासूनच शोध आणि संघर्षाची राहिली आहे. वाघांना सुरक्षित अधिवास देण्यासाठी २०१० मध्ये हा प्रकल्प घोषित झाला खरा, पण २०२२च्या गणनेत सह्याद्रीत एकही वाघ नसल्याचे आढळले. या निष्कर्षाने वनविभागाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आणि सुरू झाली वाघांच्या पुनर्वसनाची नवी मोहीम.
सध्या या प्रकल्पात तीन वाघांची नोंद आहे. सह्याद्रीमध्ये २०१८ साली पहिल्या वाघाचे दर्शन झाले. पुढे २०२३ला दुसरा आणि २८ ऑक्टोबर २०२४ रोजी तिसऱ्या वाघाचे दर्शन झाले. या वाघांचा संसार फुलविण्यासाठी पहिल्या टप्प्यात पेंच आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघिणी सह्याद्रीमध्ये सोडण्यात येणार आहेत. हा संपूर्ण उपक्रम फक्त वाघ संरक्षणापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण जैवविविधता व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. सह्याद्रीमध्ये सध्या असलेले तीन नर वाघ स्वत: स्थलांतरित झाले आहेत. आता जो प्रयोग केला जात आहे त्यात वनविभागाकडून हे स्थलांतरण केले जाणार आहे. हा फरक इथे लक्षात घ्यायला हवा.
जगभरात वाघांचे संरक्षण व पुनर्वसनासाठी स्थलांतरणाची अनेक उदाहरणे आहेत. रशिया, इंडोनेशिया, मलेशिया, चीन या देशांतही वाघाचे स्थलांतरण झाले आहे. अमेरिकेत आणि थायलंडमध्ये कृत्रिम अधिवासाची अडचण आणि नर-मादी संख्येचे व्यवस्थापन करण्यात चूक झाल्याने अनेक प्रयोग अपयशी ठरले. भारतात वाघ स्थलांतरणाचा इतिहास संमिश्र आहे. राजस्थानच्या सरिस्का व्याघ्र प्रकल्पात वाघांचे स्थलांतर यशस्वी झाले आहे. हे भारतातील पहिले यशस्वी वाघ स्थलांतर मानले जाते. पन्ना व्याघ्र प्रकल्पात २००९ मध्ये शेवटच्या वाघाचे नामोनिशाण मिटले. त्यामुळे बांधवगड, कान्हा आणि पेंचमधून वाघ आणून पन्नाला वाघांचे अस्तित्व बहाल करण्यात आले. सह्याद्रीमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पासाठी ही उदाहरणे आदर्श ठरू शकतात. मात्र, सावधगिरी न राखल्याने वाघाचे स्थलांतर अयशस्वी झाल्याची उदाहरणेही आहेत. २०१८ मध्ये मध्यप्रदेशमधून ओडिशातील सातकोसिया टायगर रिझर्व्हमध्ये दोन वाघ स्थलांतरित केले गेले. मात्र, स्थानिक गावकऱ्यांनी याला विरोध केला. मोठे आंदोलन झाले. वाघ मृतावस्थेत आढळला. त्याला मारल्याचा संशय व्यक्त केला गेला. दुसऱ्या वाघिणीने काही लोकांवर हल्ला केला. त्यामुळे स्थलांतरणाचा हा प्रयोग येथे थांबवावा लागला. मध्य प्रदेशातील बांधवगडमध्येही असेच घडले. या उदाहरणांमधून महाराष्ट्राच्या वनविभागाने काय धडा घेतला हे फार महत्त्वाचे आहे.
ताडोबा आणि सह्याद्रीच्या जंगलातले वातावरण, जैवविविधता आणि भूगोल एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे दक्षिण उष्णकटिबंधीय कोरड्या पानगळीचे दाट जंगल आहे. येथे सागवान, बांबू, गवताळ कुरणे असा मिश्रित अधिवास आढळतो. प्रचंड जैवविविधता, शाकाहारी प्राण्यांची मोठी संख्या आणि वाघांसाठी पुरेशा भक्ष्याचा साठा हे हवे असणारे घटक येथे आहेत. सह्याद्रीचा पट्टा पावसाळी, दाट जंगल, घनदाट जमीन आणि कठीण डोंगराळ भूभाग या स्वरूपाचा आहे. येथे मातीची मोठ्या प्रमाणात धूप, जंगलतोड, आणि वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाला आहे.
नद्या, मोठ्या उतार, आणि वेगळ्या वनस्पतींचा दबदबा आहे. वाघांसाठी भक्ष्यसंख्या कमी, वावरण्यास अपुरी जागा आणि मानवी वस्तीचा धोका ही मोठी आव्हाने सह्याद्रीत आहेत. हा विचार करतानाच जंगल बदलामुळे शारीरिक, वर्तनात्मक आणि पर्यावरणीय परिणाम होतो. यासंदर्भात काय काळजी घेतली जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. नवा अधिवास आणि जुना अधिवास यात साम्य किती? उपलब्ध भक्ष्य किती? मानवी हस्तक्षेप किती? तापमान, पर्जन्यमान आणि भूभाग किती? या सर्व बाबी जुळून आल्या, तर महाराष्ट्राचा हा प्रयोग संपूर्ण भारतासाठी नवा आदर्श प्रस्थापित करू शकेल. अन्यथा, हे स्थलांतरणही जंगलातून माणसाच्या संघर्षाकडे जाण्याची सुरुवात होऊ शकते.
gajanan.diwan@lokmat.com