अजितदादांचा सल्ला पोलीस मनावर घेतील का?; नेमका निशाणा कुणावर याचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 10:29 AM2021-01-10T10:29:33+5:302021-01-10T10:31:14+5:30

पोलीस आयुक्तांची जबाबदारी वाढली, पोलिसांचा वचक सामान्यांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असावा, असे सांगून खरचं दादांनी पोलिसांना योग्य सल्ला दिला आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही बाब दिलासादायक आहे.

Will the police take Dy CM Ajit Pawar's advice into consideration ? | अजितदादांचा सल्ला पोलीस मनावर घेतील का?; नेमका निशाणा कुणावर याचीच चर्चा

अजितदादांचा सल्ला पोलीस मनावर घेतील का?; नेमका निशाणा कुणावर याचीच चर्चा

Next
ठळक मुद्देपोलिसांचा वचक सामान्यांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असावा, असे सांगून खरचं दादांनी पोलिसांना योग्य सल्ला दिलानवनव्या योजना राबवून नवे आयुक्त पोलीस दलाबरोबर शहरालाही सुदृढ करण्याच्या कामात व्यस्त आहेत.दादांनी शुक्रवारी पोलिसांच्याच कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांना सज्जड दम भरला आहे

योगेश्वर माडगूळकर

पिंपरी : पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी एका कार्यक्रमात पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करावी, त्याबाबत राजकीय हस्तक्षेप होणार नाही. कोणीही तुम्हाला फोन करणार नाही, कोणाचा फोन आला तर सांगा, मी बघतो त्या फोनवाल्याला, अशा सूचना दिल्या. खरचं दादांचे बोल म्हणजे शहरवासीयांसाठी ‘खास’ बात आहे. पण त्यातून त्यांनी नेमका कुणावर निशाणा साधला, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागली आहे. दादांनी पोलिसांमधील राजकीय हस्तक्षेप थांबविला तर शहरवासीय ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले...’ असेच म्हणतील. मात्र, प्रत्यक्षात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला २०१४ मध्ये एकहाती सत्ता मिळाली. राज्यातही युतीचे सरकार सत्तेवर आले. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले. आयुक्तालयात आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती झाली. पण आयुक्तालयाचा गाढा हाकताना ते वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी यापलीकडे गेले नाहीत. गुन्हेगार माेकाट आणि पोलीस सुसाट अशी अवस्था होती. त्यानंतर संदीप बिष्णोई पोलीस आयुक्त म्हणून आले. त्यांनाही गुन्हेगारांवर वचक ठेवता आला नाही. शहरात सुरू असलेल्या मटक्यामुळे अनेकांचे संसार धुळीला मिळाले आहेत. तर गावठी दारूमुळे अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष देवाघरी गेला. मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय वाढले. आर. के. पद्मनाभन यांच्या काळातील ऐशोआराम आणि हप्तेवसुलीबाबत एका पोलीस कर्मचाऱ्यानेच पत्र लिहून बोभाटा केला आहे. त्याचा तपास सुरू आहे. पण या पत्रामुळे अनेकांची मोक्याची ठिकाणे बदलून नवे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी खांदेपालट केली आहे.

विशेषत: भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने राज्यभर केलेल्या अदल्या-बदल्यांमध्ये धडाकेबाज पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी सोपवली आहे. यात आयुक्तांप्रमाणेच धडाकेबाज असलेले उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचीच मोठी भूमिका असल्याची चर्चा आहे. कृष्ण प्रकाश यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, नवनव्या योजना राबवून नवे आयुक्त पोलीस दलाबरोबर शहरालाही सुदृढ करण्याच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, अजूनही पोलिसांच्या डोळ्यावर हात ठेवून पडद्याआडून अवैध धंदे सुरू आहेत. संघटित गुन्हेगारी थांबलेली नाही. त्याउलट नवे गुन्हेगार तयार होत आहेत. रात्री अकराला हाॅटेल बंद करा, असे आदेश आहेत. पण हॉटेल उशिरापर्यंत सुरू असतात. तिथेच भांडणे होतात. पोलीस स्टेशन डायरीची पाने भरतात. पण छोट्या-मोठ्या गुन्ह्यात राजकारणीच हस्तक्षेप करत असल्याने पोलिसांचाही नाइलाज होताना दिसतो. दादांनी शुक्रवारी पोलिसांच्याच कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. आधीच कृष्ण प्रकाश यांच्या नियुक्तीने हवालदिल झालेले अवैध धंदेवाले दादांच्या वक्तव्याने पुरते हादरले आहेत. पोलिसांनी त्याला साजेशी कामगिरी करावी.

पोलिसांचा वचक सामान्यांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असावा, असे सांगून खरचं दादांनी पोलिसांना योग्य सल्ला दिला आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही बाब दिलासादायक आहे. कृष्ण प्रकाश यांच्या मदतीने शहरातील व्हाइट काॅलर गुन्हेगारी संपविली, तर पिंपरी-चिंचवड शहर दादांना धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. तसेच आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिका राजकारणातही भाकरी फिरल्यास आश्चर्य वाटायला नको.

Web Title: Will the police take Dy CM Ajit Pawar's advice into consideration ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.